यवत, ता. 25 : आम्ही पोलीस आहोत, परिसरात चोरट्यांनी नागरिकांचे सोन्याचे दागिने लुटले आहेत, असे सांगून चार अनोळखी भामट्यांनी एका 74 वर्षीय शेतकऱ्याला विश्वासात घेत त्याच्या गळ्यातील सोन्याची चैन आणि हातातील दोन अंगठ्या हातचलाखीने लंपास केल्याची घटना केडगाव परिसरात घडली. या दागिन्यांची किंमत सुमारे 2 लाख 40 हजार रुपये असून, याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात चार अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

किसन बाबुराव पानसरे (वय 74, रा. दापोडी, दुलेवस्ती, ता. दौंड) हे 23 ऑक्टोबर रोजी सकाळी आपल्या शेतातील कामासाठी लुना दुचाकीवरून मांगोबाचा माळ येथील गट क्रमांक 41 मधील शेतात गेले होते. शेतातील काम आटोपून ते दुपारी घरी परतत असताना केडगाव हद्दीतील जराड वस्ती येथे दापोडी-दुलेवस्तीच्या रस्त्यावर चार अनोळखी व्यक्ती दुचाकींवर थांबलेल्या होत्या.
त्यापैकी दोघांनी तोंडाला मास्क लावला होता. त्यांनी पानसरे यांना थांबवून आपण पोलीस असल्याचे सांगितले. परिसरात चोरट्यांनी सोन्याचे दागिने चोरल्याचे सांगत, मौल्यवान वस्तू घालून फिरू नका, गळ्यातील चैन आणि हातातील अंगठ्या रुमालात बांधून खिशात ठेवा, असा सल्ला दिला.

त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून पानसरे यांनी गळ्यातील सोन्याची चैन आणि दोन अंगठ्या रुमालात ठेवण्यासाठी काढल्या. यावेळी त्यांच्यापैकी एकाने रुमालाची गाठ व्यवस्थित बांधून देण्याच्या बहाण्याने रुमाल हातात घेतला. त्याने दागिने रुमालात ठेवल्याचा भास निर्माण केला आणि रुमाल पानसरे यांच्या खिशात ठेवला. त्यानंतर चारही जण दुचाकींवरून चौफुला-न्हावरा रस्त्याने पारगावच्या दिशेने निघून गेले. काही वेळाने संशय आल्याने पानसरे यांनी रुमाल उघडून पाहिला असता, त्यामध्ये सोन्याची चैन आणि दोन्ही अंगठ्या नसल्याचे आढळले.

दरम्यान, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी परिसरात आरोपींचा शोध घेतला; मात्र ते मिळून आले नाहीत. चोरीस गेलेल्या दागिन्यांमध्ये बदामाच्या आकाराचे लॉकेट असलेली सुमारे एक तोळ्याची सोन्याची चैन, पिळाची नक्षी असलेली एक तोळ्याची अंगठी आणि स्वस्तिक नक्षी असलेली एक तोळ्याची अंगठी यांचा समावेश आहे. या तिन्ही दागिन्यांची एकूण किंमत 2 लाख 40 हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार कोथळकर पुढील तपास करीत आहेत.






