डॉ. अशोक बालगुडे

हडपसर : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील लक्ष्मी कॉलनी ते कवडीपाट टोलनाका दरम्यान बेशिस्त वाहनपार्किंग आणि रस्त्यालगत फळ-भाजीविक्रेत्यांनी थाटलेल्या दुकानांमुळे वाहतुकीचा अक्षरशः बोजवारा उडाला आहे. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून नागरिकांना तासन्तास वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागत असताना वाहतूक पोलीस आणि महापालिकेचा अतिक्रमण विभाग नेमकी कोणाची वाट पाहत आहे, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

संबंधित यंत्रणा बघ्याची भूमिका घेत असून, अतिक्रमणांकडे दुर्लक्ष करण्यामागे कथित आर्थिक व्यवहार आहेत का, असा गंभीर आरोप गोविंद कुंजीर, मयूर फडतरे, बाळासाहेब विधाते, गजानन विभुते, प्रा. अरुण झांबरे आणि अशोक मोरे यांनी केला आहे.महामार्ग हा वाहनांच्या सुरळीत वाहतुकीसाठी आहे की बेशिस्त पार्किंग आणि अनधिकृत विक्रीसाठी, असा प्रश्न या परिस्थितीमुळे निर्माण झाला आहे.

रस्त्याच्या कडेला वाहने उभी केली जात असल्याने आणि फळ-भाजीविक्रेत्यांची दुकाने थाटली जात असल्याने वाहतुकीची कोंडी वाढत आहे. याचा फटका वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांना बसत आहे. महामार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवण्याची जबाबदारी असलेल्या यंत्रणांनी या परिस्थितीकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.
विशेष म्हणजे, हडपसरमधील महापालिका सहायक आयुक्त कार्यालयातील अतिक्रमण विभागाचे लेखनिक संबंधित परिसराची हद्द आपल्या विभागात येत नसल्याचे सांगत असल्याचा दावा नागरिकांनी केला आहे. मग हडपसर क्षेत्रीय कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांकडून या भागात कथितरीत्या हप्ते कसे घेतले जातात, असा सवालही नागरिकांनी उपस्थित केला आहे. हे आरोप गंभीर असून, त्यांची संबंधित प्रशासनाने चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी होत आहे.
दरम्यान, हडपसर वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक अविनाश ढमे यांनी मागील आठवड्यापासून धडक कारवाई सुरू केल्याचे सांगितले. कारवाईदरम्यान कोणाचाही मुलाहिजा बाळगला जात नाही. वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
मात्र, केवळ कारवाईचा दावा करून प्रश्न सुटणार नाही. लक्ष्मी कॉलनी ते कवडीपाट टोलनाका दरम्यान नियमित गस्त, बेशिस्त पार्किंगवर सातत्यपूर्ण कारवाई, अनधिकृत अतिक्रमणांवर नियंत्रण आणि संबंधित विभागांमध्ये समन्वय आवश्यक आहे. हद्दीचे कारण पुढे करून जबाबदारी झटकणाऱ्या प्रशासनाने आधी नागरिकांना वाहतूक कोंडीतून मुक्त करावे. महामार्ग मोकळा ठेवणे ही नागरिकांवर उपकार करण्याची बाब नसून प्रशासनाची जबाबदारी आहे!






