बारामती: पुण्यातील एका खासगी कंपनीत व्यवस्थापक म्हणून कार्यरत असलेल्या ४१ वर्षीय प्रवीण जगताप यांचा जीव बारामती शहर पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला. डायल ११२ वर आलेल्या एका निनावी फोनमुळे पोलिसांनी त्यांच्या घरावर धाड टाकली असता, ते अर्धवट बांधलेल्या विटा आणि सिमेंटच्या चेंबरमध्ये बेशुद्धावस्थेत आढळून आले. या प्रकरणी पोलिसांनी त्यांच्या पत्नी शर्मिला प्रवीण जगताप (३८) हिला अटक केली आहे.

पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, शर्मिला जगताप हिने पतीला गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध केले. त्यानंतर क्रिकेटच्या बॅटने त्यांच्यावर हल्ला करून त्यांना घरातील अर्धवट बांधलेल्या विटा आणि सिमेंटच्या चेंबरमध्ये ठेवण्यात आल्याचा आरोप आहे.

यासाठी काही मजुरांना चेंबर पूर्णपणे बंद करण्यासाठी बोलावण्यात आले होते. मात्र, चेंबरमधून हालचाल होत असल्याचे लक्षात आल्यानंतर आणि महिलेच्या स्पष्टीकरणाबाबत संशय आल्याने त्यापैकी कोणीतरी डायल ११२ वर निनावी फोन करून पोलिसांना माहिती दिली.

माहिती मिळताच बारामती शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत घराची झडती घेतली. त्यावेळी प्रवीण जगताप हे चेंबरमध्ये बेशुद्ध अवस्थेत, मात्र जिवंत आढळून आले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी पोलिसांनी शर्मिला जगताप हिला अटक केली असून, तिच्याविरोधात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) अंतर्गत खुनाचा प्रयत्न आणि पुरावे नष्ट करण्यासह संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुंगीचे औषध वापरण्यात आले होते का, तसेच संपूर्ण घटनाक्रम नेमका कसा घडला, याचा पोलिस आणि न्यायवैद्यक तज्ज्ञांकडून तपास सुरू आहे.







