फुरसुंगी, ता. 19 : विवाहबाह्य संबंधांच्या (Phursungi) वादातून पत्नीला पतीने बेदम मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पत्नीने पतीच्या विरोधात फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
संतोष पोपट थोरात, वय-36 वर्ष, धंदा व्यवसाय, रा. भेकराईनगर, फरसंगी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे. याप्रकरणी पत्नीने दिलेल्या तक्रारीनुसार पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा विवाह 2019 मध्ये संतोष थोरात यांच्याशी झाला होता. 2025 पर्यंत संसार सुरळीत सुरू असताना, जून महिन्यात प्रियांका यांनी पतीचा मोबाईल तपासला. त्यामध्ये एका मुलीसोबतचे चॅटिंग आणि फोटो पाहिले. याबाबत जाब विचारला असता, संतोष याने ती आपली मैत्रीण असून तिच्याशी लग्न करणार असल्याचे सांगितले.
संतोष थोरात याचे हडपसर येथील मंजू (बदललेले नाव) नावाच्या मुलीशी विवाहबाह्य प्रेमसंबंध असल्याचे समोर आले आहे. पत्नीने या संबंधांना विरोध केला असता, संतोषने “नीट राहायचे असेल तर राहा, नाहीतर चालती हो,” असे म्हणत मारहाण सुरू केली. वारंवार समजावून सांगूनही आणि माहेरच्या लोकांनी मध्यस्थी करूनही पतीने आपले वागणे सुधारले नाही.
दरम्यान, 22 सप्टेंबर 2025 रोजी जेव्हा फिर्यादी व माहेरच्या लोकांनी संतोषला समजावण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याने सर्वांना शिवीगाळ करत “तुम्हा सगळ्यांना बघून घेतो,” अशी धमकी दिली. 4 मार्च 2026 रोजी पुन्हा याच कारणावरून मोठा वाद झाला. पतीने प्रियांका यांना पुन्हा मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. पतीच्या वाढत्या जाचाला कंटाळून अखेर 5 मार्चपासून फिर्यादी या 3 वर्षांच्या मुलासह माहेरी राहण्यास गेल्या. याप्रकरणी पती संतोष थोरात याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.







