आदित्य बोराटे
Indapur News इंदापूर, ता. १७ : पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात मदनवाडी येथे रविवारी भीषण आग लागल्याची घटना घडली. विजेच्या शॉर्टसर्किटमुळे ‘सुपर गादी सेंटर’ या दुकानाला आग लागून काही क्षणांत संपूर्ण दुकान जळून खाक झाले. या आगीत अंदाजे दहा लाख रुपयांहून अधिक किमतीचा माल भस्मसात झाल्याने दुकानदारावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. Indapur News

मिळालेल्या माहितीनुसार, दुकानातून अचानक धूर आणि ज्वाळा बाहेर येऊ लागल्याने परिसरात एकच धावपळ उडाली. गाद्या, फर्निचर साहित्य आणि ज्वलनशील वस्तूंमुळे आग काही मिनिटांतच भडकली. स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीला धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर बारामती ॲग्रो अग्निशामक दलाला माहिती देण्यात आली. Indapur News

अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत मोठ्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत संपूर्ण दुकान आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते. दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच भिगवण पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून घटनेची नोंद घेतली असून, प्राथमिक तपासात विजेच्या शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. Indapur News
सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, दुकानाचा विमा नसल्याने दुकानदार शमशाद जाहिद पिंजारी यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. आयुष्यभराची कमाई काही मिनिटांत राख झाल्याने त्यांनी शासनाकडे आर्थिक मदतीची मागणी केली आहे. दरम्यान, या घटनेमुळे मदनवाडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, विद्युत सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होत आहेत. Indapur News







