लोणी काळभोर : आळंदी म्हातोबा (ता. हवेली) येथील पानमळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ही इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत वर्गाची द्विशिक्षकीय शाळा आहे. मात्र मागील अडीच वर्षापासून एक शिक्षिका कायमस्वरूपी गैरहजर असल्याने ही शाळा एका शिक्षकावर सुरु आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान झाले आहे.
याबाबत शाळा व्यवस्थापन समितीने वेळोवेळी आवाज उठवून हवेली पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी, गट विकास अधिकारी, जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) ते थेट मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे शिक्षक मिळावा. म्हणून नेहमी मागणी केली. मात्र पाठपुरावा करूनही रिक्त पदांची पूर्तता होत नसल्याने, १५ नोव्हेबर पर्यंत शिक्षक न भेटल्यास शाळा कायमस्वरूपी बंद करण्याचा ठराव नुकताच शालेय व्यवस्थापन समितीने मंजूर केला आहे.
कुंजीरवाडीचे केंद्रप्रमुख शब्बीर शेख यांच्या उपस्थितीत शाळा व्यवस्थापन समिती व पालकांची बैठक ३० ऑगस्ट रोजी पार पडली. या बैठकीत वरील निर्णय घेण्यात आले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सतीश शिवरकर, उपाध्यक्ष अमोल शिवरकर, पुणे जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य संदिप शिवरकर, हनुमंत जवळकर, संजय जवळकर, अश्विनी शिवरकर, रतन जवळकर, प्रमोद शिवरकर, अभिजीत हाळे, विजया गव्हाणे, मीनाक्षी शिवरकर, रोहिणी शिवरकर व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
पानमळ्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक नसल्याने हवेलीचे गटशिक्षणाधिकारी, हवेली गटविकास अधिकारी जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) ते थेट मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे प्रत्येकी ३ पत्रे पाठविली आहेत. तर हवेलीचे गटशिक्षणाधिकारी यांना शाळेच्या माध्यमातून सदर शिक्षकाबाबत शालेय गैरहजर रिपोर्ट ११ वेळा लेखी कळविण्यात आला आहे. मात्र लेखी पत्रव्यवहार करूनही कोणत्याही स्वरूपाची दखल घेण्यात आलेली नाही. अनेक वेळा पाठपुराव्यानंतरही शिक्षण विभागाकडून डोळेझाक केली आहे. असा आरोप पालकांनी केला आहे.
काही केले तरी कायमस्वरूपी शिक्षक मिळत नसल्याने शाळा व्यवस्थापन समितीने, पालक व केंद्रप्रमुख यांच्या बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत ग्रामस्थांनी शिक्षण विभागाच्या कामकाजाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. या बैठकीत १५ नोव्हेंबरपर्यंत कायमस्वरुपी शिक्षक न मिळाल्यास शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तसेच याबाबत निर्णय लेखी पत्राद्वारे जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्हा शिक्षण विभागाला कळविण्यात आला आहे.
दरम्यान, या शाळेमध्ये अनेक गरीब विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र या शाळेत गेल्या अडीज वर्षापासून एका शिक्षकाचे पद रिक्त आहे. याचा शाळेच्या पटसंख्येवर परिणाम झाला असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे. शिक्षण विभागातील अनागोंदी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे अनेक पालकांनी आपले पाल्य दुसऱ्या शाळेत दाखल केले आहेत.
याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी हवेली पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी ज्ञानदेव खोसे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी फोन न उचलल्याने त्यांची प्रतिक्रिया समजू शकली नाही.
एवढ्या मोठ्या प्रमाणात शाळा व्यवस्थापन समिती व पालकांनी पत्रव्यवहार करूनही शिक्षक मिळत नसेल तर ही फार मोठी शोकांतिका आहे. पोर्टल नुसार शिक्षक देण्याचे धोरण शिक्षण विभागाने घेतले आहे. आज बऱ्याच जिल्हा परिषद शाळेत शिक्षक नाहीत आणि गुणवत्ता पूर्ण शिक्षण जिल्हा परिषद शाळेतच होईल. असा बोभाटा शिक्षण विभाग करतो आहे. मुळात पट संख्येच्या आधारावर शिक्षक देऊन जिल्हा परिषद शाळा अपंग करण्याचे काम शिक्षण विभाग करत आहे. शिक्षण विभागाला प्रत्येक वर्गाला एक शिक्षक देणे परवडत नसेल तर जिल्हा परिषद शाळा बंद करून घ्याव्यात. व महाराष्ट्रातील गरीब जनतेवर उपकार केल्यासारखे शिक्षण विभागाने वागू नये. या सर्व गोष्टीला जबाबदार असणाऱ्यांचा तीव्र निषेध व्यक्त करून संताप व्यक्त करत आहे.
संदिप शिवरकर (सदस्य – पुणे जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद)
शिक्षण विभागाकडे आमच्या गरिबांच्या मुलांना शिकविण्यासाठी जर शिक्षकच नसतील तर शाळाच बंद करा. आम्ही आमच्या पोरांना मेंढ्या नाही तर म्हशी घेऊन देऊ. शिक्षण विभागाचा हा भोंगळ कारभार आहे. तसेच शाळा व्यवस्थापन समितीच्या निर्णयास आमचा पूर्ण पाठिंबा आहे.
रतन हनुमंत जवळकर (सदस्या-शाळा व्यवस्थापन समिती)