पुणे: महाराष्ट्राची वैभवशाली परंपरा असलेल्या आषाढी वारीमध्ये जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचा ३४१ वा पालखी सोहळा यंदा मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. श्री क्षेत्र देहूगाव येथून ७ जुलै रोजी हा भक्तीमय सोहळा पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होईल. अधिक मासामुळे यंदाची वारी गेल्या वर्षीच्या तुलनेत १९ दिवस उशिराने सुरू होत असून, संत तुकाराम महाराज संस्थानने यासाठी विशेष नियोजन केले आहे.

संस्थानचे अध्यक्ष जालिंदर मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पदाधिकाऱ्यांनी पालखी मार्गाची आखणी केली आहे. यंदाच्या प्रवासात पुणे शहरातील निवडुंगा विठ्ठल मंदिरात पालखी दोन दिवस मुक्कामी असेल, तर उर्वरित मार्गावर पालखीचा मुक्काम एका दिवसाचाच असणार आहे. त्यामुळे वारकऱ्यांनी वेळेचे योग्य नियोजन करून पंढरीसाठी वाटचाल करणे आवश्यक आहे.
वारीमधील सर्वात महत्त्वाचे आकर्षण म्हणजे विविध ठिकाणी होणारे रिंगण आणि धावा सोहळा यामध्ये बेलवडी, इंदापूर आणि अकलूज येथे ‘गोल रिंगण’ आयोजित केले जाणार असून, माळीनगर, बाजीराव विहीर आणि वाखरी येथे भाविकांना ‘उभे रिंगण’ पाहता येईल. तोंडले बोंडले येथे होणारा ऐतिहासिक ‘धावा’ सोहळा हा वारकऱ्यांच्या ऊर्जेचा आणि आनंदाचा मुख्य क्षण असेल.
७ जुलै रोजी देहूगावातून निघालेली ही पालखी आकुर्डी, पुणे, लोणी काळभोर, बारामती आणि इंदापूर असा प्रवास करत २४ जुलै रोजी पंढरपुरात पोहोचेल. २५ जुलै रोजी नगर प्रदक्षिणा संपन्न होईल. आषाढी एकादशी साजरी केल्यानंतर, २९ जुलैपर्यंत पालखी पंढरपुरातच मुक्कामी असेल. त्यानंतर परतीचा प्रवास सुरू होऊन ९ ऑगस्टला पालखी पुन्हा श्री क्षेत्र देहू येथील मूळ मंदिरात विसावेल. लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत आणि विठ्ठल नामाच्या गजरात हा सोहळा महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवतो, ज्यासाठी अनेक वारकरी आतुरतेने वाट पहात आहेत.







