पुणे: राज्यातील शालेय शिक्षणाबाबत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या विविध चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे की, नवीन शैक्षणिक वर्ष ठरल्याप्रमाणे १५ जूनपासूनच सुरू होणार आहे. शाळा उशिरा सुरू होणार किंवा शिक्षण ऑनलाइन पद्धतीने दिले जाणार, यांसारख्या अफवांवर आता विश्वास ठेवण्याची गरज नाही. सर्व शाळा पारंपरिक पद्धतीने, म्हणजेच ऑफलाईन स्वरूपातच सुरू राहतील.

शाळांना २ मेपासून उन्हाळी सुट्ट्या होत्या. या सुट्ट्या संपल्यानंतर १५ जूनला शाळा सुरु होणार असून, या निर्णयामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक अशा सर्व स्तरांवरील शाळांसाठी हेच वेळापत्रक लागू असेल. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी शिक्षण विभागाने ऑफलाईन शिक्षणावर भर दिला आहे, त्यामुळे १५ जूनपासून शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा पुन्हा एकदा उत्साह पाहायला मिळणार आहे.
विदर्भातील शाळांच्या वेळापत्रकाबाबत शिक्षण विभागाने विशेष सूचना दिल्या आहेत. तिथे उष्णतेची परिस्थिती लक्षात घेता, १५ जून ते २९ जून या कालावधीत शाळा सकाळी ७ ते ११.४५ या वेळेत भरवण्यात येणार आहेत. त्यानंतर ३० जूनपासून विदर्भातील शाळाही राज्यातील इतर शाळांप्रमाणेच नियमित वेळेत सुरू होतील. दरम्यान, अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या या अधिकृत वेळापत्रकाची नोंद घ्यावी.







