Palakhi News यवत : ‘ज्ञानोबाऽऽ तुकारामऽऽ’च्या गजरात, टाळ-मृदंगाच्या गजरात संत श्री चांगावटेश्वर महाराज पालखीचे सायंकाळी ०५.३० सुमारास यवत येथे ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करण्यात आले. (Palakhi News) दि.१६ रोजी बोरीऐंदी येथील मुक्काम आटपून पालखीने आज सकाळी यवतकडे प्रस्थान केले. (Palakhi News)
सहजपूर येथे दुपारची विश्रांती घेत पालखी सायंकाळी पाचच्या सुमारास विश्रांतीसाठी दोरगे वस्ती येथे थांबली. या ठिकाणी जय भवानी मित्र मंडळ यांच्या वतीने चहा, दूध व अल्पोपहाराची सोय करण्यात आली होती.
विश्रांतीनंतर पालखी सोहळ्याचे विश्रामगृह जवळ जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुरेश शेळके, ह.भ.प नाना महाराज दोरगे, ह.भ.प सोनबा महाराज कुदळे, ग्रामविकास अधिकारी बबन चखाले, कैलास दोरगे, बापू रायकर यांसह श्री काळभैरवनाथ देवस्थान ट्रस्ट व ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करण्यात आले.
भगव्या पताका हातात घेत, तुळशी वृंदावनासह टाळ-मृदंगाच्या गजरात हरिनामाचा जयघोष करत संत श्री चांगावटेश्वर महाराज पालखी सोहळा सायंकाळी सातच्या सुमारास यवत येथील श्रीकाळभैरवनाथ मंदिरामध्ये मंदिरात विसावला. यवतचे माजी उपसरपंच सदानंद दोरगे, दत्तात्रय दोरगे, अरविंद दोरगे,चंद्रकांत दोरगे, रोहन दोरगे, स्वप्निल शिर्के यांसह ग्रामस्थांच्या हस्ते आरती करण्यात आली. आरतीनंतर ह.भ.प.सोनबा महाराज कुदळे यांचे कीर्तन संपन्न झाले, यावेळी यवत ग्रामस्थांच्या वतीने वारकऱ्यांची जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.
या पालखी सोहळ्यातील रथासाठी यवत येथील बबन तात्या दोरगे व नगरखाण्यासाठी छगन कुदळे यांच्या बैलजोडींना मान मिळालेला असून यावर्षी रथापुढे २० तर रथामागे ७ अशा एकूण २७ दिंड्या असल्याची माहिती असल्याची माहिती पालखी सोहळा प्रमुख ह.भ.प जनार्दन महाराज वाबळे व मुख्य चोपदार ह.भ.प शशिकांत महाराज जगताप यांनी दिली.
पालखी सोबतच्या दिंड्या मंदिर, जिल्हा परिषद शाळा व विद्या विकास विद्यालयात थांबल्या असून प्राथमिक आरोग्य केंद्र खामगाव यांच्यावतीने
वारकऱ्यांसाठी औषध उपचाराची सोय करण्यात आली होती. यवत व परिसरातील भाविकांनी संत श्री चांगावटेश्वर महाराजांच्या पादुकांचे दर्शनसाठी गर्दी केली होती.