फुरसुंगी, (पुणे): फुरसुंगी-उरुळी देवाची नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे ओंकार मच्छिंद्र कामठे यांनी 20 विरूद्ध 8 मतांनी विजय मिळवला. गुरुवारी (ता. 15) नगराध्यक्ष संतोष फकीरा सरोदे यांच्या अध्यक्षतेखाली हि निवडणूक पार पडली. यावेळी निवडणूक सहायक म्हणून मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांनी काम पाहिले.

फुरसुंगी-उरुळी देवाची नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष पदासाठी गुरुवारी सकाळी नगराध्यक्ष संतोष सरोदे यांच्या प्रमुख उपस्थितीत ओंकार कामठे व शिवसेनेच्या नगरसेविका राणी बाळासाहेब हरपळे यांनी मुख्याधिकार्यांकडे अर्ज सुपूर्द केला होता. विहित कालावधीमध्ये उपनगराध्यक्ष पदासाठी छाननी प्रक्रियेत दोन्ही अर्ज वैध राहिल्याने व कुणीही माघार न घेतल्याने निवडणूक होणार हे निश्चित झाले.
या मतदानात भाजपाचे 5 नगरसेवक गैरहजार राहिले होते. उपनगराध्यक्ष निवडणुकीत 19 मते व नगराध्यक्षाचे एक मत असे एकूण 20 मते ओंकार कामठे यांना मिळाली तर 8 मते राणी बाळासाहेब हरपळे यांना मिळाली. त्यामुळे ओंकार कामठे यांची उपनगराध्यक्षपदी निवड झाल्याचे नगराध्यक्ष संतोष सरोदे यांनी जाहीर केले. ओंकार कामठे यांची निवड होताच कार्यकर्त्यांकडून मोठा जल्लोष केला.
दरम्यान, प्रथमच झालेल्या फुरसुंगी-उरुळी देवाची सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) नगराध्यक्ष पदासह 32 पैकी 19 जागा जिंकत फुरसुंगी नगरपरिषदेवर आपला झेंडा फडकवला आहे.







