गणेश सुळ
केडगाव : डिसेंबर महिना सुरु झाला की अनेक मेंढपाळ मेंढ्या चारण्यासाठी ठाणे, पालघर जिल्ह्यात जात असतात. दौंड तालुक्यातील अनेक मेंढपाळ सध्या आपल्या मेंढ्यांना सोबत घेऊन त्यांच्या पोटा-पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी पालघर जिल्ह्याकडे रवाना होताना दिसत आहेत.
सध्या देवळगाव गाडा, खोर, बोरीबेल अशा अनेक भागांतील मेंढपाळांनी आपल्या मेंढ्या घेऊन दौंड तालुक्यातून स्थलांतर केले आहे. मेंढपाळ जाताना काही शेतकऱ्यांच्या शेतात पाडाव टाकताना दिसत आहेत. सध्याच्या वातावरण बदलाचा परिणाम मेंढ्यांच्या प्रकृतीवर होत असून, त्यांच्या तब्येतीची काळजी घेत मेंढपाळांचा हा प्रवास सुरू आहे.
मेंढपाळ म्हणजे उपासमार, हालअपेष्टा सहन करून कडक उन्हात, थंडीत उघड्यावर संसार घेऊन फिरणारी जमात. गावाकडे दुष्काळी परिस्थिती असल्याने मेंढरांना पाण्याची, चाऱ्याची कमतरता भासते. यामुळे दरवर्षी मेंढपाळ अन्य जिल्ह्यांमध्ये राहून आपल्या मेंढ्यांचा व स्वतःच्या पोटा-पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करतात. पोटच्या मुलाप्रमाणे ते मेंढ्यांची काळजी घेतात. हिरवा चारा व पोटभर पाणी मिळेल, या आशेवर यांची भटकंती सुरु असते.
शेतकऱ्यांच्या शेतात मेंढ्या बसवून त्या बदल्यात काही शिधा, आर्थिक मदत मिळेल व त्यावर उदरनिर्वाह करायचा असा एकंदर विचार ते करत असतात. आजारी जनावरांचे कुत्रे, बाबट्यांपासून संरक्षण करावे लागते. यातच शेतमालाला योग्य भाव नसणे, दूधाच्या बाजारभावात घट, व्यवसायातील अडचणी, अवकाळी पावसाने शेतमालाचे झालेले नुकसान यामुळे मेंढपाळांना पहिल्यासारखी मागणी नाही.
पूर्वी ग्रामीण भागात मेंढपाळ आल्यास शेतकरी आपल्या शेतीत मेंढ्यांना मुक्काम ठोकण्यास सांगत असत. त्यांना लागेल ती शिधा देत असत. आता परिस्थिती बदलली असून, मेंढपाळांचे महत्त्व कमी होत आहे. याबाबत सरकारकडून देखील सकारात्मक विचार होणे गरजेचे आहे, अशी मेंढपाळांची मागणी आहे.
सध्या डोंगर माथ्यावरील गवत वाळले असून ओढे, नाले, तलाव, विहिरी देखील आटल्या आहेत. त्यामुळे आम्ही ठाणे, पालघर या भागाकडे स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे. या भागांत देखील पूर्वीसारखी मागणी नाही. परंतु तेथे मिळणारा हिरवा चारा व मुबलक पाणी यामुळे मेंढ्यांच्या पोटा-पाण्याची चांगली व्यवस्था होते. काही दिवस मुक्कम करून पुन्हा गावी निघणार आहोत.
– नायकू होलगुंडे, मेंढपाळ