शिरूर : शिरुर लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी रांजणगाव एमआयडीसीमधील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ गोदाम येथे मंगळवारी (ता. 0४) होणार आहे. या मतमोजणी दिवशी परिसरात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी अजय मोरे यांनी चार ठिकाणी नो-पार्किंग झोन घोषित केला आहे.
पुणे-अहमदनगर महामार्गावरील राजमुद्रा चौक, रांजणगांव ते फलकेमळा, कारेगांव या रोडच्या दरम्यान दोन्ही बाजू, यश ईन चौक ते उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय रस्त्याच्या दोन्ही बाजुस, यश ईन चौक ते रांजणगांव एमआयडीसी पोलीस स्टेशन अंतर्गत एमआयडीसी रोड, युकेबी कंपनी कॉर्नर ते आयटीसी कंपनी गेट एमआयडीसी अंतर्गत रोड या ठिकाणी कोणीही वाहने पार्कीग करू नयेत. मतमोजणी करीता येणारे शासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी वाहन पार्किंग व्यवस्था ज्योतून कंपनीजवळ असलेल्या मोकळ्या मैदानात करण्यात आली आहे.
मतमोजणीसाठी येणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी वाहन पार्किंग व्यवस्था अहमदनगरकडुन पुण्याच्या दिशेने जाताना फुलराणी गोडाऊनच्या मोकळ्या मैदानामध्ये, हॉटेल रीजन्सीच्या पुढील बाजुस, कारेगांवचे हददीमध्ये अहमदनगरकडुन पुण्याच्या दिशेने हॉटेल पाटीलवाडाचे मागील बाजुस असेलेले मोकळे मैदान तसेच कारेगांवचे हद्दीमध्ये पुण्याकडून अहमदनगरच्या दिशेने जात असताना हरीता कंपनी लगत असलेल्या मोकळ्या मैदानामध्ये करण्यात आली आहे.
दरम्यान, पार्किंग व्यवस्था करण्यात आलेल्या ठिकाणीच वाहने पार्क करावीत. पार्कीगकरीता बंदी असलेल्या ठिकाणी वाहने पार्क केल्यास सदर वाहनांवर कारवाई करण्यात येईल याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असेही मोरे यांनी सांगीतले आहे.