न्हावरे: गेल्या सहा महिन्यांपासून न्हावरे व परिसरातील वाड्या-वस्त्यांवर दररोज सायंकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत घरगुती वीजपुरवठ्याचे भारनियमन करण्यात येत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर त्याचा विपरीत परिणाम होत असून, गृहिणींनाही स्वयंपाकासह दैनंदिन कामकाज करताना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने तसेच चोऱ्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने रात्रीच्या वेळी वीजपुरवठा खंडित राहणे नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनेही गंभीर बाब असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.सायंकाळच्या अत्यंत महत्त्वाच्या वेळेत वारंवार भारनियमन करून महावितरण जाणीवपूर्वक जनतेची गैरसोय करत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

या पार्श्वभूमीवर आज न्हावरे (ता.शिरूर) येथील महावितरणचे सहाय्यक अभियंता राजेंद्र धाडगे यांना शांततापूर्ण मार्गाने निवेदन देण्यात आले.नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन सायंकाळी ६ ते १० या वेळेतील भारनियमन तातडीने बंद करावे,अन्यथा भविष्यात तीव्र स्वरूपाचे लोकआंदोलन छेडण्यात येईल,असा इशारा यावेळी देण्यात आला.
याप्रसंगी दिनेश दरेकर, नितीन खंडागळे, कैलास कोरेकर, संदीप खंडागळे, विकास भगत, राहुल कोरेकर, विलास कांडगे, हिरामण करपे, नानासाहेब कुटे, दादासाहेब सोनवणे आणि काँग्रेस पवार यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.







