पुणे: पुण्यात किरकोळ कारणावरून एका 17 वर्षीय मुलाला मारहाण केल्याप्रकरणी पोलिस कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रस्त्यावरील खड्ड्यात साचलेले पाणी अंगावर उडाल्याने संतापलेल्या या पोलिसाने अल्पवयीन मुलाचा दुचाकीवरून पाठलाग केला. त्यानंतर रस्त्यात अडवून त्याला मारहाण केल्याचा आरोप आहे. ही घटना लोहगाव परिसरात घडली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, 26 जुलै रोजी रात्री सुमारे 9 वाजता डी. वाय. पाटील रस्त्यावर हा प्रकार घडला. संबंधित मुलगा मोपेडवरून घरी जात होता. त्यावेळी पावसामुळे रस्त्यावर साचलेले चिखलाचे पाणी समोरून येणाऱ्या दुचाकीवरील व्यक्तीच्या अंगावर उडाले. मुलाने लगेच माफी मागितली. मात्र, तरीही दुचाकीस्वाराने त्याचा पाठलाग सुरू केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

राजरत्न हॉटेलजवळ त्या मुलाला अडवून त्याच्या मोपेडसमोर दुचाकी उभी करण्यात आली. त्यानंतर शिवीगाळ करत त्याला मारहाण केल्याचा आरोप आहे. घटनेनंतर आरोपी तेथून निघून गेला. घरी गेल्यानंतर घाबरलेल्या मुलाने वडिलांना घडलेला प्रकार सांगितला. आरोपीच्या दुचाकीवर ‘पोलीस’ असा उल्लेख असल्याची माहितीही त्याने दिली.

यानंतर लोहगाव पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी परिसरातील अनेक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. जवळपास महिनाभर चाललेल्या तपासानंतर दुचाकी आणि संबंधित व्यक्तीची ओळख पटली.
वसंत जगताप असे आरोपी पोलिस कर्मचाऱ्याचे नाव असून तो चंदननगर पोलिस ठाण्यात कार्यरत असल्याची माहिती आहे. पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असून लवकरच न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.







