उरुळी कांचन, (पुणे) : “मम्मी, मी तुला एक दिवस लय मोठा होऊन दाखवणार, आता माझे नशीब मीच लिहिणार… मला शोधू नका प्लीज” अशी भावूक चिठ्ठी लिहून साडे सोळा वर्षीय अल्पवयीन मुलगा अचानक गायब झाल्याची घटना घडली आहे. कोरेगाव मूळ (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील कानकाटेवस्ती परिसरात सोमवारी (ता. 27) हा प्रकार घडला.

लोणी काळभोर येथील एम.आय.टी. कॉलेजला जातो असे सांगून घरातून निघालेला हा मुलगा त्याच्या एका मित्रासह निघून गेल्याचा संशय कुटुंबियांनी केला आहे. आर्यन निलेश गवारे (वय 16 वर्षे 8 महिने) असे बेपत्ता झालेल्या मुलाचे नाव आहे. याबाबत मुलाचे वडील निलेश किसन गवारे (वय-46, व्यवसाय- शेती, रा. कानकाटेवस्ती, कोरेगाव मूळ, ता. हवेली) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्यन गवारे हा कॉमर्सचे शिक्षण घेतो. सोमवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास नेहमीप्रमाणे दुचाकी घेऊन “कॉलेजला जातो” असे सांगून घरून निघाला. सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास मुलगा घरी न परतल्याने वडिलांनी त्याच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचे दोन्ही मोबाईल नंबर बंद येत होते. यानंतर वर्गशिक्षक यांच्याशी संपर्क साधला असता आर्यन आणि त्याचा मित्र भूषण राऊत हे दोघेही त्या दिवशी वर्गात आलेच नसल्याचे समजले.
कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेत असताना उरुळी कांचन येथील आर्यनचा मित्र आयुष नरवडे याने सांगितले कि, “तीन दिवसांपूर्वी मी, आर्यन गवारे आणि भूषण राऊत अशा तिघांनी मुंबईला जाऊन काहीतरी काम करून मोठे होऊन दाखवायचे ठरवले होते, परंतु मी मुंबईला येण्यास नकार दिला होता,” अशी माहिती आयुषने दिली.
दरम्यान, शोध घेत असताना आर्यनने कॉलेजला नेहलेली बजाज चेतक गाडी नातेवाईकांच्या घरासमोर पार्क केलेली मिळून आली. त्या गाडीची डिक्की उघडून पाहिली असता त्यात आर्यनची एक वही सापडली. त्या वहीत आर्यनने लिहिलेली चिठ्ठी आढळली त्यामध्ये “मम्मी मी तुला एक दिवस लय मोठा होवून दाखवीनार आता माझे नशीब मीच लिहीनार मला शोधू नका प्लीज.”अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून फुस लावून त्याला पळवून नेल्याची खात्री पटल्याने वडिलांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात धाव घेतली.
दरम्यान, उरुळी कांचन पोलिसांनी मुलाचे वडील निलेश गवारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. आर्यन गवारे (वय 16 वर्षे 8 महिने) , वर्णन: रंग गोरा, उंची 6 फूट 1 इंच, बांधा सडपातळ, केस काळे व बारीक, कपडे: पांढऱ्या रंगाचा शर्ट (पँटची माहिती नाही), भाषा : मराठी, हिंदी व इंग्रजी बोलतो.या वर्णनाचा मुलगा कोणाला आढळून आल्यास तात्काळ उरुळी कांचन पोलिसांशी किंवा पालकांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल खोमणे करीत आहेत.







