उरुळी कांचन, (पुणे) : “मम्मी मी तुला लय मोठा होऊन दाखवीन, आता माझे नशीब मीच लिहिणार…” अशी चिठ्ठी लिहून कोणालाही काही न सांगता घरातून निघून गेलेल्या 16 वर्षीय आर्यन निलेश गवारे या अल्पवयीन मुलाचा उरुळी कांचन पोलीस आणि नातेवाईकांनी शोध लावला आहे.

कॉलेजला जातो असे सांगून घरातून गायब झालेला हा मुलगा त्याच्या मित्रासोबत थेट गोव्याला फिरायला गेल्याचे निष्पन्न झाले. त्याला कुटुंबाच्या स्वाधीन करण्यात आले आहे. सोमवारी (27 जुलै) सकाळी घरातून निघून गेलेल्या आर्यन गवारे याने गाडीच्या डिक्कीत ती चिठ्ठी सापडली होती. त्यानुसार तात्काळ उरुळी कांचन पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

घटनेचे गांभीर्य ओळखून उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अनिल खोमणे आणि सचिन जगताप यांनी तात्काळ तपासाची चक्रे वेगाने फिरवली. मुलाचे वडील निलेश गवारे, नातेवाईक आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि माहितीच्या आधारे शोध घेतला असता, आर्यन आणि त्याचा मित्र हे दोघेही सुखरूप असल्याची माहिती पोलिसांनी दिली.






