पुणे: पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील रासे येथे आयोजित शासकीय कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप मोहिते-पाटील भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. सुनेत्रा पवार यांच्यासमोर बोलताना त्यांनी खेड तालुक्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या कामांची आठवण करून दिली. भाषणाच्या शेवटी अजित पवार यांच्या योगदानाचा उल्लेख करताच त्यांना अश्रू अनावर झाले.

यावेळी दिलीप मोहिते-पाटील यांनी खेड तालुक्यातील पाणीटंचाई, दुष्काळ आणि जलजीवन मिशनच्या रखडलेल्या कामांबाबत नाराजी व्यक्त केली. कोट्यवधी रुपये खर्च करूनही अनेक गावांमध्ये नागरिकांना पाणी मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले. अनुभव नसलेल्या ठेकेदारांना अनेक योजना देण्यात आल्याने कामांचा वेग मंदावल्याचा आरोपही त्यांनी केला.

तसेच ग्रामीण भागातील रस्त्यांच्या कामांचे पैसे वेळेवर मिळत नसल्याने विकासकामांवर परिणाम होत असल्याचे त्यांनी नमूद केले. या प्रश्नांकडे शासनाने तातडीने लक्ष दिले नाही, तर नागरिकांमध्ये मोठा असंतोष निर्माण होऊ शकतो, असा इशाराही त्यांनी दिला.
सुनेत्रा पवार यांच्याकडे अपेक्षा व्यक्त करताना मोहिते-पाटील म्हणाले, “आम्ही दादांकडे गेलो की एका क्षणात आमच्या अडचणींवर निर्णय व्हायचा. त्याच पद्धतीने आपणही निर्णय घ्यावेत, अशी आमची अपेक्षा आहे. ग्रामीण भागात फिरल्यानंतर लोकांच्या अडचणी समजतील आणि त्यातून मार्ग काढून त्यांना न्याय देण्याचे काम आपण कराल, असा विश्वास आहे.”
भाषणाच्या शेवटी खेड तालुक्यावर अजित पवार यांचे मोठे उपकार असल्याचे सांगताना दिलीप मोहिते-पाटील यांना भावना आवरता आल्या नाहीत. “या तालुक्यावर अजित दादांचे अनंत उपकार आहेत…” एवढे बोलताच त्यांचा कंठ दाटून आला आणि त्यांनी भावूक होत भाषण आटोपते घेतले. सभागृहातील उपस्थितांनीही हा भावनिक क्षण अनुभवला.







