पुणे: पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेचा पहिला टप्पा लवकरच प्रवाशांसाठी खुला होणार आहे. तांत्रिक कामे आणि विलंबामुळे रखडलेला हा प्रकल्प आता मार्गी लागणार असल्याने नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या प्रकल्पाच्या कामाचा आढावा घेताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (PMRDA) हा मार्ग 30 जूनपर्यंत कार्यान्वित करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत.

या पहिल्या टप्प्यात एकूण 12 स्थानकांचा समावेश असून, यामुळे आयटी हबमधील नोकरदार वर्ग आणि परिसरात राहणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. हिंजवडी आणि परिसरातील मॉल तसेच कार्यालयांत जाणाऱ्या प्रवाशांचा वेळ यामुळे मोठ्या प्रमाणात वाचणार आहे.

पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. सुहास दिवसे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या मार्गावरील काही किरकोळ कामे शिल्लक आहेत. त्यामुळे १५ जुलैपर्यंत पहिल्या टप्प्यातील १२ स्थानके पूर्ण क्षमतेने प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज होतील.

पुढील स्थानके दीड ते दोन महिन्यांच्या कालावधीत शिवाजीनगरपर्यंतची सर्व २३ स्थानके सुरू करण्याचे नियोजन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
अनेक वर्षांपासून पुणेकर या मेट्रोची आतुरतेने वाट पाहत होते, आता त्यांची प्रतीक्षा संपली असून लवकरच मेट्रो सुरु होणार आहे. या प्रकल्पामुळे वाहतूक कोंडीतून मुक्तता मिळून प्रवासाचा दर्जा उंचावण्यास मदत होणार आहे.







