पिंपरी: तळेगाव दाभाडे परिसरात अल्पवयीन मुलासोबतच्या कथित प्रेमसंबंधातून एका 21 वर्षीय तरुणीविरोधात POCSO कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 17 वर्षीय मुलाच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणी आणि अल्पवयीन मुलाची सुमारे 8 ते 9 महिन्यांपूर्वी ओळख झाली होती. दोघेही लांबचे नातेवाईक असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यानंतर त्यांच्यात जवळीक निर्माण झाली.

3 सप्टेंबर रोजी तरुणी मुलाला तळेगाव दाभाडे येथील एका कॅफेमध्ये घेऊन गेली. तेथे तिने त्याचे चुंबन घेतल्याचा आरोप आहे. दुसऱ्या दिवशी ती मुलाच्या घरी गेली आणि त्याच्याशी लग्न करण्याची मागणी केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. ही बाब समजल्यानंतर मुलाच्या वडिलांनी 5 सप्टेंबर रोजी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

मुलगा अल्पवयीन असल्याने त्याच्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्याच्या उद्देशाने तरुणीने असे कृत्य केल्याचा आरोप वडिलांनी केला आहे. त्यानुसार पोलिसांनी POCSO कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.








