पुणे : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. अंतरवाली सराटी येथे सुरु असलेल्या त्यांच्या उपोषणाचा आज दहावा दिवस असून, मागणी मान्य न झाल्यास थेट मुंबईत जाऊन आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे. जरांगे पाटील यांच्या बिघडत्या तब्येतीवर सरकार लक्ष ठेवून असून अनेक प्रमुख नेते आणि मंत्र्यांनी त्यांची भेट घेऊन तसेच फोनवरून विचारपूस केली आहे.

या पार्श्वभूमीवर जालना जिल्हा प्रशासनाकडून कुणबी जात प्रमाणपत्र वाटपाच्या कामाला मोठा वेग आला आहे. न्यायमूर्ती शिंदे समितीच्या स्थापनेनंतर जिल्ह्यात कुणबी नोंदी शोधणे आणि प्रमाणपत्रे देण्याची प्रक्रिया वेगाने राबवली जात आहे.

जालना जिल्ह्यातील कुणबी प्रमाणपत्रांची स्थिती:

एकूण प्राप्त अर्ज: 18,262
मंजूर झालेले अर्ज: 18,243
नाकारलेले अर्ज: 19
पडताळणी समितीकडे आलेले अर्ज: 1,597 (त्यापैकी 1,005 अर्ज वैध ठरले आहेत)
2 सप्टेंबरच्या शासन निर्णयानुसार मिळालेले अर्ज: 421
नागरिकांना कागदपत्रांसाठी सरकारी कार्यालयांचे फेरे मारावे लागू नयेत म्हणून प्रशासनाने प्रक्रिया अत्यंत सोपी केली आहे. यासाठी जिल्ह्यातील 8 तालुक्यांमधील 62 महसूल मंडळांमध्ये विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. ही शिबिरे 16 सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहेत.
तसेच, या प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी आणि तक्रारी सोडवण्यासाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जरांगे यांच्या उपोषणामुळे निर्माण झालेल्या दबावानंतर जिल्हा प्रशासनाने दाखवलेल्या या तत्परतेमुळे हजारो मराठा-कुणबी अर्जदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.







