पुणे : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवसांच्या लंडन दौऱ्यावर गेले असून, ब्रिटिश संसदेत त्यांना तीन प्रमुख पुरस्कारांनी सन्मानित केलं जाणार आहे. या दौऱ्यादरम्यान त्यांच्या ताफ्यातील अधिकाऱ्यांच्या विमानाला तांत्रिक अडचणीचा सामना करावा लागला.

उपमुख्यमंत्र्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी आणि छायाचित्रकारांसह सहा अधिकारी मुंबईहून लंडनकडे रवाना झाले होते. मात्र, विमानातील तांत्रिक बिघाडामुळे ब्रिटिश एअरवेजच्या या विमानाचे मार्ग बदलून ते स्वित्झर्लंडमधील झुरिक येथे उतरवण्यात आले. यामुळे हे अधिकारी लंडनऐवजी झुरिकमध्ये अडकले. लंडनच्या वेळेनुसार सकाळी साडेपाच वाजता ही घटना घडली असून, त्यानंतर सकाळी सातच्या सुमारास त्यांना लंडनला पोहोचवण्याची पर्यायी व्यवस्था करण्यात आली. दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विमान वेळेवर लंडनला पोहोचले.

ब्रिटिश संसदेत 9 आणि 10 सप्टेंबर 2026 रोजी होणाऱ्या विशेष कार्यक्रमांमध्ये उपमुख्यमंत्र्यांना सन्मानित करण्यात येणार आहे:त्यांना हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये यूके एशियन बिझनेस कौन्सिल आणि ‘कॅनव्हास फॉर केअर’तर्फे त्यांना ‘कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप रिकग्निशन’ हा पुरस्कार प्रदान केला जाईल. उत्तर आयर्लंडच्या माजी फर्स्ट मिनिस्टर बॅरोनेस आर्लेन फॉस्टर आणि अँड्र्यू ग्रोकॉक यांच्या वतीने उपाध्यक्ष सुदीप सकाळे यांनी हे आमंत्रण दिले होते.

10 सप्टेंबर 2026 ला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हाऊस ऑफ कॉमन्समध्ये आयोजित ‘ग्लोबल बिझनेस अँड इन्व्हेस्टमेंट डायलॉग’मध्ये ते मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहतील. येथे त्यांना ‘स्टेटस्मनशिप अवॉर्ड’ देऊन गौरवले जाईल.
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’, ‘शासन आपल्या दारी’ आणि ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ यांसारख्या लोककल्याणकारी व पारदर्शक उपक्रमांच्या यशस्वी अंमलबजावणीची दखल घेऊन हा बहुमान दिला जात आहे. या कार्यक्रमादरम्यान ब्रिटनमधील मुलांनी महाराष्ट्रातील या योजनांवर आधारित काढलेल्या चित्रांचे एक विशेष कला प्रदर्शनही आयोजित करण्यात आले आहे.






