सासवड : उसने घेतलेले दोन हजार रुपये परत देण्यावरून झालेल्या वादात एका शेतकऱ्याला दोघांनी शिवीगाळ करत हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना तोंडल (ता. पुरंदर) येथे 7 सप्टेंबर रोजी सायंकाळी सव्वाआठच्या सुमारास घडली. यावेळी संबंधितांनी नखांनी ओरखडे काढून तसेच दगडाने डोक्यात मारून दुखापत केल्याची तक्रार सासवड पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

याप्रकरणी निखिल दत्तात्रेय शेडगे (वय 33, रा. तोंडल, ता. पुरंदर) यांनी सासवड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अमोल दासा वनवे व बाबू टापरे (पूर्ण नाव माहिती नाही, रा. टापरेवाडी, ता. भोर)यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेडगे हे शेतातून घरी जात असताना अमोल दासा वनवे याचा त्यांना फोन आला. वनवे याने उसने घेतलेले दोन हजार रुपये कधी परत देणार, अशी विचारणा केली. त्यावर शेडगे यांनी दोन-तीन दिवसांत पैसे देतो, असे सांगितले.

त्यानंतर वनवे याने कथितरीत्या शिवीगाळ करत तोंडल येथील डीपीजवळ येण्यास सांगितले. वाद मिटविण्याच्या उद्देशाने शेडगे तेथे गेले. त्यावेळी ईरटीका कारमधून खाली उतरलेल्या अमोल वनवे याने शिवीगाळ करून हाताने मारहाण केल्याचा आरोप आहे. तसेच नखांनी पोटावर व पाठीवर ओरखडे काढून दुखापत केली. याचवेळी बाजूला पडलेला दगड उचलून डोक्याच्या बाजूला मारल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, वनवे याच्यासोबत असलेल्या बाबू टापरे (पूर्ण नाव माहिती नाही, रा. टापरेवाडी, ता. भोर) यानेही शिवीगाळ करत मारहाण केली आणि अंगावर नखांनी ओरखडे काढल्याचा आरोप शेडगे यांनी केला आहे. या प्रकारानंतर गावातील नागरिक घटनास्थळी जमा झाले आणि त्यांनी भांडण सोडविले. त्यानंतर चुलते तानाजी गणपत शेडगे व चुलत भाऊ तन्मय तानाजी शेडगे यांनी जखमी निखिल शेडगे यांना प्रथम परिंचे येथील सरकारी दवाखान्यात नेले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना सासवड ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले.
उपचारानंतर प्रकृती ठीक वाटल्याने वैद्यकीय प्रमाणपत्र घेऊन त्यांनी सासवड पोलिस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. या प्रकरणी सासवड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस हवालदार बनसोडे करीत आहेत.







