पुणे: पुण्यातील नामांकित आयटी कंपनीचा गोपनीय सोर्स कोड चोरून कंपनीची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अहिल्यानगर सायबर पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक केली आहे. अटक टाळण्यासाठी आरोपीने आधी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, तेथूनही दिलासा न मिळाल्यानंतर तो दुबईला पसार झाला. पोलिसांनी त्याच्याविरोधात लुकआऊट नोटीस जारी केली होती. अखेर दुबईहून पुण्यात परतताच विमानतळावर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

मंदार प्रदीपक पाथरीकर (वय 33, रा. नवी पेठ, पुणे) असे अटक केलेल्या मुख्य आरोपीचे नाव आहे. न्यायालयाने त्याला 15 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात कंपनीचा अतिसंवेदनशील आणि गोपनीय सोर्स कोड चोरी करून त्याचा गैरवापर केल्याचा आरोप आरोपीवर आहे.

‘पीआरएम सॉफ्ट सोल्यूशन प्रा. लि.’चे प्रमुख धोरण अधिकारी (CSO) नितीन भराडिया यांनी मार्च 2026 मध्ये अहिल्यानगर सायबर पोलिसांकडे दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले होते. गुन्हा दाखल झाल्यानंतर मंदार पाथरीकर देशाबाहेर गेला आणि दुबईमध्ये असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले. त्यामुळे त्याला भारतात परत आणण्यासाठी पोलिसांनी त्याच्याविरोधात लुकआऊट नोटीस जारी केली.

दरम्यान, अटक टाळण्यासाठी आरोपीने उच्च न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने त्याचा अर्ज फेटाळल्यानंतर तो दुबईला रवाना झाला. पोलिस त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवून होते. सोमवारी मंदार दुबईहून विमानाने पुणे विमानतळावर पोहोचताच अहिल्यानगर सायबर पोलिसांच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले.
सायबर पोलिसांनी आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला 15 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. सोर्स कोड चोरीचा नेमका प्रकार, त्यामागील उद्देश, कंपनीला झालेला आर्थिक तोटा आणि या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास सायबर पोलिसांकडून सुरू आहे.







