मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील आणि राज्य सरकारमधील संघर्ष कमालीचा वाढला आहे. “मराठा समाजाला संपवण्याचीच सत्ताधाऱ्यांची मानसिकता असून, सरकार सर्व आघाड्यांवर पूर्णपणे अपयशी ठरले आहे,” असा थेट आरोप जरांगे यांनी केला आहे. आता येत्या 12 तारखेला पुढील रणनीतीवर चर्चा करून मराठा समाज थेट मुंबईत जाऊन धडक देईल, अशी घोषणा त्यांनी केली आहे .

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार संजय शिरसाट यांनी मिळून मराठ्यांची प्रमाणपत्रे रद्द केल्याचा दावा करत, सरकार ज्या पद्धतीने वागेल त्याला मराठा समाज त्याच भाषेत उत्तर देईल, असा इशारा जरांगे यांनी दिला आहे.उपोषण मागे घेण्याच्या आवाहनाला जरांगे यांनी पूर्णपणे फेटाळून लावले आहे . “उपोषण थांबवून पोळ्याचा सण साजरा करायचा का? मी आंदोलनापासून एक पाऊलही मागे हटणार नाही. माझे कोणीही काही वाकडे करू शकत नाही,” अशा शब्दांत त्यांनी आपला निर्धार व्यक्त केला.

दुसरीकडे, जरांगे पाटील यांच्या भूमिकेवर तीव्र आक्षेप घेत, “काहीही केले तरी त्यांचे समाधान होत नाही,” असे सांगत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारच्या वतीने जरांगे यांच्याशी कोणतीही नवी चर्चा न करण्याचे स्पष्ट केले. सरकारने संवादाचे मार्ग बंद केल्यामुळे जरांगे पाटील अत्यंत संतापले. “मराठा तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त होत असताना देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे केवळ बघ्याची भूमिका घेत आहेत,” असे जरांगे म्हणाले.

आंदोलन दडपण्याच्या प्रयत्नांवर बोलताना त्यांनी, “गोळ्या केवळ सरकारकडेच नाहीत, तर मराठ्यांकडेही आहेत,” असा अत्यंत तीव्र इशारा दिला. शिंदे गटाच्या समर्थक आमदारांवर ताशेरे ओढताना जरांगे म्हणाले, “नेत्यांच्या भल्यासाठी समाजावर टीका करणारे नेते तुमचे बाप आहेत का?” शिंदे मराठ्यांच्या मुलांच्या भविष्याशी खेळत असल्याचा आरोप करत, आपली आक्रमक भाषा यापुढे आणखी तीव्र होईल, असे स्पष्ट संकेत त्यांनी दिले आहेत.






