पुणे: पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील बहुळ येथे वडिलोपार्जित जमिनीच्या वाटपावरून सुरू असलेल्या वादातून एका कुटुंबाच्या घरावर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात प्रशांत रमेश साबळे (वय ३२) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या डाव्या हाताचे हाड फ्रॅक्चर झाले आहे. त्यांच्यावर चाकण येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी चाकण दक्षिण पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बहुळ येथे प्रशांत साबळे आणि त्यांच्या चुलत्यांमध्ये वडिलोपार्जित जमिनीच्या वाटपावरून काही दिवसांपासून वाद सुरू होता. शनिवारी (दि. ५) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास सुनील माणिकराव साबळे, रोहिदास माणिकराव साबळे आणि कृष्णा सुरेश साबळे यांनी प्रशांत यांच्या घरावर हल्ला केल्याचा आरोप आहे. तिघांनी घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर लाकडी काठी आणि लोखंडी पाइपने प्रशांत यांना हात, पाय, पाठ, तोंड आणि डोक्यावर मारहाण करण्यात आली.
प्रशांत यांना वाचवण्यासाठी त्यांची पत्नी भावना यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आरोपींनी त्यांनाही मारहाण करत शिवीगाळ केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तसेच, आठ दिवसांच्या आत जमीन आपल्या नावावर केली नाही, तर गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, अशी धमकी दिल्याचा आरोप आहे.

प्रशांत साबळे यांच्या तक्रारीवरून चाकण दक्षिण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय सुकाळे करत आहेत.








