पुणे : पुण्यात एमपीएससीच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या धाराशिवमधील 25 वर्षीय तरुणाने आर्थिक अडचणी आणि कर्जाच्या कारणामुleळे आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. प्रथमेश दिलीप देशमुख (रा. खासापुरी, ता. परंडा, जि. धाराशिव) असे या तरुणाचे नाव असून, नारायण पेठ परिसरात त्याने हे टोकाचे पाऊल उचलले.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रथमेश मागील दीड-दोन वर्षांपासून पुण्यात राहून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होता. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून तो गंभीर आर्थिक अडचणीत सापडला होता. त्याने काही लोकांकडून सुमारे 2.5 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. पुण्यातील दैनंदिन खर्च, अभ्यासाचा खर्च आणि राहत्या खोलीचे थकलेले भाडे भागवणे त्याला कठीण जात होते. या वाढत्या तणावामुळे तो पुन्हा गावी निघून जाण्याच्या विचारातही होता.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तेथे पोलिसांना एक चिठ्ठी (सुसाईड नोट) सापडली आहे. या चिठ्ठीत त्याने घेतलेल्या पैशांचा आणि काही व्यक्तींच्या नावांचा उल्लेख असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी नारायण पेठ पोलिस चौकीत घटनेची नोंद करण्यात आली असून, विश्रामबाग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक नवनाथ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कारवाई सुरू आहे.

चिठ्ठीत नाव असलेल्या व्यक्तींची पोलिस लवकरच चौकशी करणार आहेत. प्रथमेशवर नक्की कोणाचे किती कर्ज होते आणि या आत्महत्येमागे आणखी काही कारणे आहेत का, याचा सर्व अंगांनी शोध पोलिस घेत आहेत.







