पुणे: पुणे शहरात सध्या डासजन्य आजारांचा धोका वाढताना दिसत आहे. डेंग्यू आणि चिकनगुनियाच्या रुग्णसंख्येत वाढ झाली असून, पावसामुळे साचलेले पाणी आणि हवेत वाढलेली आर्द्रता यामुळे डासांची पैदास वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी घर आणि परिसरात पाणी साचणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पुणे महापालिकेच्या कीटकजन्य आजार विभागाच्या माहितीनुसार, ऑगस्ट महिन्यात डेंग्यूचे 485 संशयित रुग्ण आढळले. सप्टेंबरच्या सुरुवातीच्या काही दिवसांतच आणखी 76 संशयित रुग्णांची नोंद झाली आहे. राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेच्या तपासणीत ऑगस्टमध्ये 21 जणांना डेंग्यू, तर 14 जणांना चिकनगुनियाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.

विशेष म्हणजे जानेवारी ते जुलै या कालावधीत चिकनगुनियाचे केवळ 7 रुग्ण आढळले होते. मात्र ऑगस्टमध्ये या आजाराच्या रुग्णसंख्येत अचानक मोठी वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी महापालिकेने हॉटस्पॉट भागांमध्ये धूरफवारणी आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना वाढवल्या आहेत. एखाद्या भागात रुग्ण आढळल्यास त्याच्या घराच्या आसपास तातडीने डास नियंत्रणाची कार्यवाही केली जात आहे. सलग 2 ते 3 दिवस ताप, डोळ्यांच्या मागे वेदना, सांधेदुखी, उलट्या, पोटदुखी, रक्तदाब कमी होणे, जास्त अशक्तपणा किंवा लघवीचे प्रमाण कमी होणे अशी लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.







