छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जवळील तीसगाव शिवारात असलेला खवड्या डोंगर आत्महत्या आणि अपघाताचे केंद्र बनत चालले आहे.21 ऑगस्ट रोजी कौटुंबिक वादातून 19 वर्षांच्या कुणालसह त्याच्या आई-वडिलांचा खवड्या डोगरावर मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली होती. या दुर्घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून खवड्या डोंगरावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे.

गेल्या काही वर्षांत खवड्या डोगरावरून घसरून पडल्याने किंवा उडी घेतल्यामुळे 13 ते 14 लोकांचा जीव गेला आहे. त्यामुळे आत्महत्या आणि अपघात रोखण्यासाठी येथे पक्की सुरक्षा यंत्रणा उभारण्याची मागणी नागरिक करत होते. या गंभीर परिस्थितीची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी सुरक्षेबाबत तांत्रिक अहवाल तयार करण्याचे आदेश दिले. त्यानुसार प्रादेशिक पर्यटन विभाग आणि आयएफसी सल्लागार संस्थेने परिसराची पाहणी करून एक सर्वसमावेशक आराखडा तयार केला आहे.

या सुरक्षा आराखड्यानुसार डोंगराच्या धोकादायक कड्यांवर नागरिकांना जाण्यापासून रोखण्यासाठी 2700 मीटर लांबीचे आणि 2.40 मीटर (सुमारे 7.78 फूट) उंच अँटी-क्लाइंब काटेरी तारांचे कुंपण घालण्यात येईल. मुख्य रस्त्यावर भक्कम दरवाजे व अडथळे (बॅरिकेड्स) उभारले जातील. तसेच सुमारे 600 मीटर कड्याच्या भागाचे मजबुतीकरण केले जाणार आहे.

संपूर्ण परिसरावर नजर ठेवण्यासाठी 12 अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे आणि रात्रीच्या सुरक्षिततेसाठी सौर दिवे बसवले जातील. पाणी साचू नये म्हणून योग्य ड्रेनेज व्यवस्था, धोक्याचे इशारा फलक आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण देखील केले जाईल. आयएफसीचे सल्लागार व अभियंता प्रभाकर कराळे यांनी या योजनेची माहिती दिली.
नुकत्याच झालेल्या दिशा समितीच्या बैठकीत सचिन गरड यांनी या सुरक्षेचा मुद्दा लावून धरला. सध्या या क्षेत्राची भू-तांत्रिक तपासणी अंतिम टप्प्यात असून, प्रशासनाकडून प्रत्यक्ष कामाला कधी सुरुवात होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






