पुणे : सोशल मीडियावर झालेली ओळख आणि त्यातून ठरलेला बेकायदेशीर पिस्तूल खरेदीचा व्यवहार पुण्यात उघडकीस आला आहे. गोव्यातील दोन तरुण पिस्तूल खरेदी करण्यासाठी पुण्यात आले होते. मात्र, व्यवहार पूर्ण होण्याआधीच वाघोली पोलिसांनी कारवाई करत चौघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 4 देशी बनावटीची पिस्तूल, 4 मॅगझीन आणि 15 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. या शस्त्रांची एकूण किंमत 4 लाख 18 हजार 500 रुपये असल्याचे सांगण्यात आले.

या प्रकरणात आकाश उर्फ गज्या अशोक मोरे, मनीष दिलीप फर्नांडिस आणि चंद्रेश्वर माल्लेशी या तिघांना अटक करण्यात आली आहे. तर चौथा आरोपी अल्पवयीन आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केसनंद परिसरात गस्त सुरू असताना जोगेश्वरी डोंगराकडे जाणाऱ्या रस्त्यावर काही जण शस्त्रांसह येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत संशयितांना पकडले. त्यांची झडती घेतल्यानंतर मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आढळून आला.

तपासादरम्यान या व्यवहारामागील सोशल मीडिया कनेक्शन समोर आले. आकाश मोरे हा यापूर्वीही शस्त्र बाळगणे आणि खरेदी-विक्रीच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याचे पोलिसांनी सांगितले. तो सोशल मीडियावर पिस्तूलसह फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असे. हे पाहून गोव्यातील दोन तरुण त्याच्या संपर्कात आले. इंस्टाग्रामवर ओळख वाढल्यानंतर त्यांनी पिस्तूल खरेदी करण्याची तयारी दर्शवली. एका पिस्तुलासाठी सुमारे 50 हजार रुपये ठरल्याची माहिती आहे.
मात्र, पुण्यात पोहोचल्यानंतर व्यवहार पूर्ण होण्यापूर्वीच पोलिसांनी त्यांचा डाव उधळला. या प्रकरणाचा पुढील तपास वाघोली पोलीस करत आहेत.







