पुणे : पुणे शहरात पोलिस असल्याचे खोटे सांगून नागरिकांना लुटण्याचे प्रकार समोर येत आहेत. अशाच एका घटनेत कोथरूड परिसरात दोन भामट्यांनी एका ज्येष्ठ नागरिकाला लक्ष्य केले. वाहतूक नियम मोडल्याचे कारण सांगून त्यांना रस्त्यात थांबवले आणि हातचलाखीने लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने घेऊन आरोपी पसार झाले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी (18 नोव्हेंबर) कोथरूडमधील पौड रस्त्यावरील एचडीएफसी बँकेसमोर हा प्रकार घडला. संबंधित ज्येष्ठ नागरिक दुचाकीवरून प्रवास करत होते. त्याचवेळी दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांना अडवले. आपण पोलीस असल्याचे सांगत त्यांनी ज्येष्ठ नागरिकांना वाहतूक सिग्नल तोडल्याबद्दल जाब विचारला.
अचानक झालेल्या या प्रकारामुळे ज्येष्ठ नागरिक गोंधळून गेले. आरोपींनी त्यांना कारवाईची भीती दाखवली आणि याच संधीचा फायदा घेत हातचलाखी केली. त्यांच्या हातातील सोन्याच्या 4 अंगठ्या आणि गळ्यातील सोनसाखळी काढून घेत आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. चोरीला गेलेल्या दागिन्यांची एकूण किंमत 5 लाख 20 हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.

कोथरूड पोलिसांकडून तपास सुरू
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांनी पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. दोघांनी पोलिस असल्याचे भासवून हा प्रकार केल्याने परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. आरोपींची ओळख पटवून त्यांना ताब्यात घेण्यासाठी पोलीस तपास करत आहेत.






