वाघोली, (पुणे) : केसनंद ग्रामपंचायत कार्यालयासमोरील राधाई मोबाइल शॉपीचे लोखंडी शटर कटावणीच्या साहाय्याने उचकटून चार चोरट्यांनी दुकानातील जुने मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण 20 हजार रुपयांचा मुद्देमाल पळवला. ही घटना गुरुवारी (ता. 19) पहाटे घडली. चोरट्यांनी शेजारील सराफी दुकानाचे शटरही उचकटण्याचा प्रयत्न केल्याने परिसरातील व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

याप्रकरणी दुकानमालक सुमित विलास कुंदुर (वय-37, रा. जिजाऊ पार्क, वाडेबोल्हाई रोड, वाडेबोल्हाई, ता. हवेली) यांनी वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुंदुर यांचे केसनंद येथील स्कायप्राईम बिल्डिंग, दुकान क्रमांक 1, ग्रामपंचायत कार्यालयासमोर राधाई मोबाइल शॉपी नावाने मोबाईल विक्री व दुरुस्तीचे दुकान आहे. बुधवारी (ता. 18) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास त्यांनी दुकान बंद करून घरी गेले होते. गुरुवारी सकाळी दहा वाजता मित्र ईश्वर श्रीखंडे यांनी दुकानाचे शटर उचकटले असल्याची माहिती दिली. त्यानंतर कुंदुर यांनी तातडीने दुकानात जाऊन पाहणी केली असता, मोबाईल व रोकड चोरीला गेल्याचे निदर्शनास आले.

चोरीची खात्री झाल्यानंतर त्यांनी शेजारील एस.एस. सराफी दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यामध्ये गुरुवारी रात्री चार अनोळखी चोरटे दुकानाजवळ आले. 20 ते 5 वर्षे वयोगटातील या चोरट्यांनी कटावणीच्या साहाय्याने लोखंडी शटर उचकटून दुकानात प्रवेश केला. त्यानंतर दुकानातील जुने मोबाईल आणि रोख रक्कम घेऊन ते पसार झाले.
चोरट्यांनी चोरी केलेल्या मुद्देमालामध्ये सिल्व्हर रंगाचा रिअलमी नार्झो 20 ए मॉडेलचा मोबाईल, काळ्या रंगाचा रेडमी 9 प्राइम मोबाईल आणि निळ्या रंगाचा ओप्पो ए53 मोबाईल, प्रत्येकी पाच हजार रुपये किमतीचे, तसेच पाच हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण 20 हजार रुपयांचा मुद्देमाल आहे.
दरम्यान, याच चोरट्यांनी शेजारील एस.एस. सराफी दुकानाचे लोखंडी शटरही कटावणीने उचकटण्याचा प्रयत्न केला. मात्र, तेथे चोरी करण्यात त्यांना यश आले नसल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या घटनेमुळे केसनंद परिसरातील दुकानदारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, वाघोली पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.






