पुणे : दिवाळी आणि छठपूजेनंतर घरी परतणाऱ्यांची गर्दी सांभाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने नोव्हेंबर महिन्यात पुणे विभागातून दोन्ही बाजूंनी 300 पेक्षा जास्त विशेष गाड्यांच्या फेऱ्या चालवण्याची योजना आखली आहे. मात्र, इतक्या जास्त गाड्या एकाच मार्गावर धावत असल्याने रेल्वे वाहतुकीवर मोठा ताण आला आहे. याचा थेट परिणाम नेहमीच्या आणि काही विशेष गाड्यांच्या वेळेवर होत आहे. पुण्यातून निघणाऱ्या तसेच पुण्यावरून जाणाऱ्या अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या 4 ते 6 तास उशिराने चालत आहेत.

रेल्वे प्रशासनाच्या विशेष गाड्यामुळे तीन गाड्या 2 ते 8 तासांपर्यंत उशिरा धावल्या. त्यामुळे आधीच स्थानकावर आलेल्या प्रवाशांना बराच वेळ वाट पाहावी लागते आणि त्यांचे पुढचे प्रवासाचे बेत बिघडतात.प्रवाशांना वेळेवर गाड्यांची खरी माहिती मिळावी, यासाठी स्थानकांवर स्पष्ट सूचना देणे आणि डिजिटल स्क्रीनवर अद्ययावत माहिती दाखवणे आवश्यक आहे. ज्यांच्याकडे आरक्षित तिकिटे आहेत, त्यांना वेळेवर SMS करून गाडीच्या वेळेतील बदलाची माहिती दिल्यास त्यांचा गोंधळ कमी होईल. रेल्वेने गाड्यांचे रेक वेळेवर उपलब्ध करणे, मार्गाचे योग्य नियोजन आणि दुरुस्तीची कामे नीट केल्यास गर्दीच्या दिवसांतही प्रवाशांना मोठा दिलासा मिळू शकेल. यामुळे प्रवाशांचा ताण कमी होऊन प्रवास अधिक सोपा, सुरक्षित आणि शिस्तबद्ध होऊ शकतो.
सणांच्या गर्दीसाठी सुरुवातीला पुणे विभागाने 7 विशेष गाड्यांच्या 216 फेऱ्या जाहीर केल्या होत्या. या गाड्या दानापूर, गोरखपूर, गाझीपूर सिटी, हजरत निजामुद्दीन, झाशी तसेच नागपूर आणि कलबुर्गीच्या दिशेने चालवण्यात आल्या. बिहारकडे जाणाऱ्यांसाठी पुणे-दानापूर विनाआरक्षण विशेष गाडीही सुरू केली. पुढे 17 नोव्हेंबर रोजी पुणे-दानापूरच्या आणखी 5 फेऱ्या आणि हडपसर-गोरखपूरची 1 जादा फेरी जाहीर झाली.

विशेषतः UP आणि बिहारकडे जाणाऱ्या व येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांना जास्त उशीर होत आहे. हडपसर-गोरखपूर गाडीचा रेक उशिरा आल्याने 4 तास विलंब झाला, तर हडपसर-दरभंगा गाडीचा रेक वेळेत न पोहोचल्याने 10 तास उशीर झाला. खडकी-इंदूर गाडीही रेकच्या अभावामुळे 1 तास उशिरा सुटली. सिग्नलला लागणारा वेळ आणि समोरच्या गाडीला रस्ता देण्यासाठी नियमित गाड्या थांबवाव्या लागत असल्याने प्रवास लांबतो. याचा त्रास वृद्ध, लहान मुले आणि कुटुंबांसोबत प्रवास करणाऱ्यांना जास्त होतो.
दरम्यान स्थानकांवर पाणी, शौचालये आणि बसण्याची सोय कमी पडल्यास प्रवाशांची धावपळ होते, तसेच नोकरी व शिक्षणासाठी जाणाऱ्यांचे वेळापत्रकही कोलमडते.






