पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक 6 नोव्हेंबरपासून आपल्या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केले आहे. विद्यार्थी http://www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर जाऊन ते तपासू शकतात. मात्र आता फेब्रुवारी-मार्च 2027 मध्ये होणाऱ्या बारावीच्या परीक्षेतील अर्थशास्त्र विषयाच्या पेपरच्या वेळेत मंडळाने बदल केला आहे.

अर्थशास्त्र विषयाचा पेपर आधी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत होणार होता. परंतु सुधारित वेळापत्रकानुसार, अर्थशास्त्राची परीक्षा 17 फेब्रुवारी 2027 रोजी दुपारी 3 ते सायंकाळी 6 या सत्रात होईल. राज्य मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी या निर्णयाची माहिती दिली आहे.विद्यार्थ्यांनी बदललेली वेळ लक्षात घेऊनच अभ्यासाचे नियोजन करावे, असे मंडळाने सांगितले आहे. अर्थशास्त्र वगळता बारावी आणि दहावीच्या बाकी सर्व विषयांच्या तारखा व वेळा कायम ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे इतर विषयांच्या वेळापत्रकाबाबत विद्यार्थ्यांनी कोणतीही चिंता करू नये.
या परीक्षा राज्यातील पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक, कोल्हापूर, अमरावती, लातूर, छत्रपती संभाजीनगर आणि कोकण या 9 विभागांत घेतल्या जाणार आहेत.संकेतस्थळावर दिलेले वेळापत्रक फक्त माहिती पुरते आहे, हेही मंडळाने स्पष्ट केले आहे. शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना पाठवलेली छापील प्रतच अंतिम धरली जाईल.

त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या शाळा किंवा कॉलेजमधून मिळालेल्या वेळापत्रकावरूनच तारखा व वेळा पक्क्या कराव्यात. तसेच व्हॉट्सअॅप किंवा सोशल मीडियावर येणाऱ्या खोट्या किंवा अपुऱ्या वेळापत्रकांवर विश्वास ठेवू नये, असा इशाराही देण्यात आला आहे.






