पुणे : पुण्यातील पुरंदर तालुक्यात एका महिला शिक्षिकेची निर्घृण हत्या झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. मौजे पांगारे गावात ही धक्कादायक घटना घडली असून, विशेष म्हणजे त्यांच्या मुलीच्या वाढदिवसाच्या दिवशीच ही दुर्दैवी घटना घडल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सासवड पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास वेगाने सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत शिक्षिकेचे नाव उज्वला रामदास काकडे (वय 47 वर्षे) असे आहे. त्या पांगारे गावच्या रहिवासी होत्या आणि हडपसरमधील साधना विद्यालयात शिक्षिका म्हणून काम करत होत्या. नेहमीप्रमाणे त्या आपल्या घरापासून हडपसर येथील शाळेत जाण्यासाठी निघाल्या होत्या. पांगारे येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या परिसरात पोहोचल्यावर, एका मालवाहू वाहनाने त्यांना पाठीमागून जोरदार धडक दिली.
वाहनाच्या धडकेनंतर हल्लेखोर तिथेच थांबला नाही. त्याने धारदार शस्त्राने उज्वला यांच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर सपासप वार केले, तसेच त्यांच्या डोक्यात दगड घालून त्यांना गंभीर जखमी केले. या भीषण हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. उज्वला यांच्या पतीचे यापूर्वीच निधन झाले असून, त्यांच्या पश्चात एक मुलगी आहे. लेकीच्या वाढदिवशीच आईचे छत्र हरपल्याने काकडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

या हत्येचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नसले तरी, पैशांची देवाणघेवाण किंवा जमिनीच्या वादातून हा प्रकार घडला असावा, अशी चर्चा गावकऱ्यांमध्ये सुरू आहे. या घटनेनंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी मारेकऱ्याला लवकरात लवकर अटक करून कडक शिक्षा देण्याची मागणी केली आहे.
सासवड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांची 2 विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांच्या मदतीने पोलीस मारेकऱ्याचा कसून शोध घेत आहेत. लवकरच आरोपीला जेरबंद करून या हत्येमागील खरे कारण उघड केले जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.






