पुणे: विठुरायाच्या भेटीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांचा प्रवास आता अधिक सुखकर आणि किफायतशीर होणार आहे. कार्तिकी एकादशीच्या यात्रेनिमित्त होणारी संभाव्य गर्दी पाहता, पुणे एसटी प्रशासनाने भाविकांसाठी खास गाड्यांचे नियोजन केले आहे. विभागीय अधिकारी कमलेश धनराळे यांनी या विशेष बससेवेबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.

या यात्रेसाठी 19 ते 24 नोव्हेंबर या काळात स्वारगेट स्थानकातून 100 अतिरिक्त गाड्या धावणार आहेत. यासोबतच दररोज सुटणाऱ्या 20 नियमित बसही प्रवाशांच्या सेवेत सुरूच राहतील. म्हणजेच भाविकांसाठी एकूण 120 बसची सोय करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, प्रवाशांना आता पुण्यापर्यंत येण्याचे कष्ट घ्यावे लागणार नाहीत. जर एखाद्या गावातून 40 किंवा त्याहून जास्त प्रवाशांनी एकत्र येऊन मागणी नोंदवली, तर त्यांच्या गावातूनच थेट पंढरपूरसाठी एसटी सोडली जाईल. या सामूहिक बुकिंगमध्ये राज्य शासनाच्या विविध सवलतींचाही लाभ मिळणार आहे. यामध्ये 75 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या वृद्धांना प्रवास पूर्णपणे मोफत असेल, तर महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना तिकीट दरात 50 टक्के सूट दिली जाईल.

प्रवाशांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, यासाठी स्वारगेट आगारात एक स्वतंत्र मदत व माहिती कक्ष उभारण्यात आला आहे. गावातून थेट पंढरपूरला जाण्यासाठी भाविकांनी एकत्रित आरक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी महामंडळातर्फे करण्यात आले आहे. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील भक्तांना कमी खर्चात आणि थेट आपल्या गावातूनच विठ्ठल दर्शनासाठी जाणे शक्य होणार आहे.






