मुंबई : जिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदली प्रक्रियेत वारंवार अपील करून बदलीच्या ठिकाणी रुजू होण्यास टाळाटाळ करणाऱ्या शिक्षकांना ग्रामविकास विभागाने स्पष्ट संदेश दिला आहे. आता बदलीचे ठिकाण बदलून मिळावे, अशी मागणी करणाऱ्या शिक्षकांना आधी नव्या शाळेत रुजू व्हावे लागणार आहे. त्यानंतरच त्यांच्या निवेदनाचा विचार केला जाणार आहे.

राज्यात जिल्हा परिषदांच्या 62,105 प्राथमिक शाळा असून, त्यामध्ये जवळपास 2 लाख 36 हजार शिक्षक कार्यरत आहेत. बदली प्रक्रियेत राजकीय हस्तक्षेप आणि गैरप्रकार टाळण्यासाठी मागील 8 वर्षांपासून ऑनलाइन बदली धोरण राबवले जात आहे. मात्र, बदलीचा आदेश मिळाल्यानंतर काही शिक्षक नवीन ठिकाणी जाण्याऐवजी बदली रद्द करण्यासाठी किंवा ठिकाण बदलण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे अपील दाखल करतात.
नियमानुसार अशा तक्रारींवर 30 दिवसांच्या आत निर्णय घेणे अपेक्षित आहे. परंतु, अनेक प्रकरणांमध्ये निर्णय लांबणीवर पडतो. त्यामुळे अपील निकाली निघेपर्यंत शिक्षक नव्या शाळेत रुजू होत नाहीत. याचा परिणाम शाळांमधील शिक्षकांच्या उपलब्धतेवर आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत असल्याचे समोर आले आहे. या समस्येविरोधात मागील वर्षी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिकाही दाखल करण्यात आली होती.

या पार्श्वभूमीवर ग्रामविकास विभागाने विभागीय आयुक्तांना नवीन निर्देश दिले आहेत. बदलीच्या आदेशानुसार शिक्षकांनी आधी नवीन ठिकाणी हजर होणे आवश्यक आहे. त्यानंतरच बदली बदलण्याच्या मागणीवर मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा विभागीय आयुक्त निर्णय घेऊ शकतील.
तसेच, शिक्षकांनी सादर केलेल्या निवेदनावर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी 30 दिवसांत निर्णय घेणे बंधनकारक आहे. नव्या ठिकाणी रुजू न झालेल्या शिक्षकांचे अपील विचारात घेतले जाणार नाही. त्यामुळे बदली प्रक्रियेत होणारा विलंब कमी होऊन शाळांमधील शिक्षकांची उपलब्धता सुधारण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे.






