सागर जगदाळे
भिगवण, (पुणे) : मराठा आरक्षणासाठी एल्गार पुकारलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी सरकारकडे 13 मागण्या करत निर्णायक इशारा दिला होता. आज (27 जानेवारी) दुपारी बारापर्यंत मराठ्यांच्या मागण्यांवर विचार नाही केला, तर थेट आझाद मैदानात जाऊन उपोषण करण्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला होता. या पार्श्वभूमीवर शिंदे सरकारने तातडीने पावलं उचलत मध्यरात्रीच मनोज जरांगे पाटील यांनी केलेला मागण्या मान्य करत जीआर जारी केला.
दरम्यान, इंदापूर तालुक्यातील तक्रारवाडी गावात छत्रपती शिवाजी महाराज चौकात फेटे घालून, फटाके फोडून, एकमेकांना पेढे भरवत मराठा बांधवांनी जल्लोष साजरा केला. यावेळी डीजेच्या तालावर मराठा बांधवानी ठेका धरला. तक्रारवाडीतील सर्व तरुण मोठ्या संखेने उपस्थित होते. ‛एक मराठा लाख मराठा’ अशा घोषणा देत निर्णयाचे स्वागत केले. यावेळी लहान मुलांनी, वृद्धांनी तसेच महिलांनी देखील सहभागी होत आरक्षणाचे स्वागत केले.