अमोल दरेकर
सणसवाडी : सकल मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील राज्याव्यापी दौरा करत आहेत. शौर्यपीठ म्हणून ओळख असणाऱ्या तुळापूर या ठिकाणी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान भूमीजवळ जरांगे पाटील नतमस्तक झाले. या वेळी तुळापूर ग्रामस्थ्यांनी फुलांच्या पायघड्या घालत, जेसीबीतून फुलांचा वर्षाव तसेच फाटक्यांची आतषबाजी करत मनोज जरांगे पाटील यांचे स्वागत केले. त्यावेळी त्यांनी संगमेश्वराचे दर्शन घेतले आणि महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. ग्रामस्थांनी मनोज जरांगे यांना मावळी पगडी, शंभूराजे यांचा काचेतील पुतळा देऊन सन्मान केला.
मराठा समाजाचा आजपर्यंत विश्वासघात झाला आहे. त्यामुळे यापुढे कोणतेही चुकीचे पाऊल आता उचलू नका. मराठा समाजाला आरक्षण मिळणारच आहे. समाजातील राजकीय भूमिका बाजूला ठेवून मुला-बाळांसाठी एकत्र येण्याची गरज आहे.
आपल्याला ७० वर्षांपूर्वी आरक्षण मिळाले असते तर आपला समाज नक्कीच सर्वांत पुढे गेला असता. आतापर्यंत २९ लाख लोकांच्या कुणबी मराठा नोंदी सापडल्या आहेत. यामुळे आपण ७० टक्के लढाई जिंकली आहे. इतर समाजाच्या लोकांनी मराठा समाजाला जो वेढा टाकला होता, तो आपण तोडला आहे. मराठा समाजाला ओबीसी वर्गात आरक्षण मिळणार आहे.
या वेळी जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांचे नाव न घेता टीका केली. जो कुणी संविधान पदावर बसून मराठा समाजाला वेठीस धरील, त्याला आता किंमत द्यायची गरज नाही, असे प्रतिपादन मनोज जरांगे यांनी केले. या कार्यक्रमासाठी आमदार अशोक पवार यांच्यासह स्थानिक प्रतिनिधी, ग्रामस्थ, धर्मवीर संभाजी माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी आदी उपस्थित होते.