गणेश सुळ
केडगाव, (पुणे): पारगाव ते यवत रस्त्याचे काम सुरू असल्याने खुटबाव (ता. दौंड) परिसर गेल्या काही दिवसांपासून वाहतूक कोंडीसाठी कुप्रसिद्ध बनला आहे. सकाळपासून ते रात्री उशिरा पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांग लागलेल्या असतात. या वाहतूक कोंडीमुळे प्रवासी, विद्यार्थी, कामगार आणि व्यापारी वर्गाला रोज त्रास सहन करावा लागतो. (pune traffic)

या चौकात दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढतच चालली आहे. या सततच्या वाहतूक कोंडीमुळे परिसरातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे वारंवार होणाऱ्या या वाहतूक कोंडीतून लवकरात लवकर मार्ग काढावा अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.
शिरूर ते चौफुला, पुणे ते सोलापूर या महामार्गांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग असल्याने येथे हजारो वाहनांची वर्दळ असते. त्यातच चौकातील अपुरे व दिरंगाईने चाललेले काम अपवाद ठरत आहे. खुटबाव परिसरातील तसेच रोडलगत असलेले पर्यायी मार्ग खोदून ठेवल्याने दररोज जवळपास 20 ते 25 वाहने अडकून पडल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. त्यामुळे दोन मिनिटांच्या प्रवासासाठी दीर्घ काळ धूळ खात उभे राहावे लागत आहे.
दरम्यान, परिसरात मोठे महाविद्यालय व जिल्हा परिषद शाळा असल्याने विद्यार्थ्याचा सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होत आहे. या बंद मार्गामुळे शेतीसाठी लागणारी खते, औषधे, मशागतीची यंत्रणा शेतात पोहचत नाही. पशुपालकांना देखील डोक्यावर लांबून चारा घेऊन यावा लागत आहे. हे महामार्गाचे काम टप्प्या टप्प्याने करावे व सर्व प्रवासी तसेच शेतकरी यांना होणारा त्रास थांबवावा अशी मागणी परीसातील नागरिक करू लागले आहेत.





