लोणी काळभोर, ता. 7 : शहरी भागातील एचपी गॅस ग्राहकांप्रमाणेच आता ग्रामीण भागातील ग्राहकांनाही मोठा दिलासा मिळणार आहे. एचपी गॅसचा सिलेंडर बुक केल्यानंतर पुढील सिलेंडरसाठी २५ दिवसांची प्रतीक्षा करण्याची सुविधा ग्रामीण भागातही सुरू करण्यात आली आहे. सोमवारी (ता. ७) दुपारी दोन वाजल्यापासून या सुविधेला सुरुवात झाली.

लोणी काळभोर (ता. हवेली) येथील पाषाणकर गॅस एजन्सीचे संचालक राहुल शिरसागर यांनी याबाबत माहिती दिली. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील एचपी गॅस ग्राहकांना मोठा फायदा होणार असून, सिलेंडरची गरज असलेल्या नागरिकांना आता पूर्वीपेक्षा अधिक सुलभतेने गॅस उपलब्ध होणार आहे.

दरम्यान, सोमवारी दुपारी दोन वाजल्यापासूनच नागरिकांनी सिलेंडर बुकिंग करून सिलेंडर घेण्यास सुरुवात केली. त्यामुळे ग्रामीण भागातील ग्राहकांसाठी ही सुविधा दिलासादायक आणि आनंदाची बातमी ठरली आहे.

नवीन सुविधेमुळे नियमित गॅस वापरणाऱ्या कुटुंबांना विशेषतः मोठा फायदा होणार असून, सिलेंडर संपल्यानंतर पुन्हा बुकिंगसाठी होणारी प्रतीक्षा कमी होण्यास मदत होणार आहे.







