माळेगाव : माळेगाव सहकारी साखर कारखान्याची ७१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा सभासदांच्या प्रश्नांवरून झालेल्या गोंधळामुळे चर्चेत आली. उपमुख्यमंत्री तथा कारखान्याच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली सुरू असलेल्या सभेत वारंवार घोषणाबाजी आणि आक्षेपांमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

सभेदरम्यान काही सभासदांनी कारखान्याच्या कामकाजाबाबत प्रश्न उपस्थित केले. सातत्याने प्रश्न विचारूनही त्याची उत्तरे दिली जात नसल्याचा आक्षेप घेत संबंधित प्रश्नांची तातडीने उत्तरे देण्याची मागणी सभासदांनी केली. या मुद्द्यावरून काही सभासद आणि व्यवस्थापनामध्ये बाचाबाची झाली. त्यामुळे सभागृहातील वातावरण काही काळ तापले.

यानंतर सभेचे कामकाज सुरू ठेवत विषयपत्रिकेचे वाचन करण्यात येत होते. त्यावेळी पुन्हा सभागृहात गोंधळ झाला. काही सभासदांकडून विषयांवर आक्षेप घेतले जात असतानाच दुसऱ्या बाजूने ‘विषय मंजूर, मंजूर’ अशा घोषणा देण्यात आल्या. त्यामुळे दोन्ही बाजूंनी झालेल्या घोषणाबाजीमुळे सभागृहातील वातावरण अधिकच तणावपूर्ण झाले.

गोंधळ वाढत असल्याने विरोधी गटाचे नेते, भाजपचे पदाधिकारी तसेच कारखान्याचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान संचालक चंद्रराव तावरे यांनी उभे राहून सभासदांशी संवाद साधला. त्यांनी सभेतील परिस्थितीबाबत आपली आणि विरोधी गटाची भूमिका मांडली.
दरम्यान, सभेतील गोंधळ वाढत असल्याचे पाहून कारखान्याच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी स्वतः माईक हातात घेतला. त्यांनी सभासदांना शांत राहण्याचे आवाहन केले. तसेच सभेचे कामकाज सुरळीतपणे सुरू राहण्यासाठी सहकार्य करण्यास सांगितले.
त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली असून सभेचे पुढील कामकाज सुरू असल्याची माहिती आहे.







