इंदापूर, ता. 9 : दसऱ्यानिमित्त घराची साफसफाई करताना बंद खोलीचा दरवाजा उघडल्याच्या कारणावरून शेजाऱ्यांमध्ये वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन एका 23 वर्षीय महिलेसह तिची आई, वडील आणि भावाला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. ही घटना पिंपरी बुद्रुक (ता. इंदापूर) येथे 7 ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. या प्रकरणी सहा जणांविरुद्ध इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शशिकांत भोई, वंदना भोई, सुसाबाई भोई, जया दत्तात्रय फतुले, ताई भोई आणि प्रशांत भोई अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी शिवानी नागनाथ भंडलकर (वय 23 , रा. पिंपरी बुद्रुक, ता. इंदापूर) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवानी या दसऱ्यानिमित्त बंद असलेल्या खोलीचा दरवाजा उघडून घरातील कपडे व इतर साहित्याची साफसफाई करत होत्या. साफसफाई केल्यानंतर त्यांनी घरातील सामान बाहेर काढून ठेवले होते.

त्यावेळी शेजारी राहणारा शशिकांत भोई हा घराच्या मागील दरवाजातून आत आला. ‘खोलीचा दरवाजा का उघडला?’ असे विचारत त्याने शिवानी यांचे केस धरून त्यांची मान मुरगळली. शिवानी यांनी आरडाओरडा केल्यानंतर त्यांची आई रंजना या घटनास्थळी आल्या. त्यावेळी शशिकांत याने त्यांनाही जमिनीवर ढकलून दिले. यानंतर वंदना भोई, सुसाबाई भोई, जया दत्तात्रय फतुले आणि ताई भोई या घटनास्थळी आल्याचा आरोप आहे. जया फतुले हिने हातातील टणक वस्तूने रंजना यांच्या छातीवर मारहाण केली, तर इतर महिलांनी शिवानी आणि त्यांच्या आईला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

या घटनेनंतर शिवानी यांनी फोन करून आपला भाऊ शंभुराज याला बोलावले. त्यानंतर वडील नागनाथ आणि भाऊ शंभुराज घटनास्थळी आले. त्यावेळी शशिकांत भोई, प्रशांत भोई आणि दत्तात्रय फतुले हेही तेथे आले. संबंधितांनी नागनाथ आणि शंभुराज यांना हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. प्रशांत भोई याने शंभुराज यांची कॉलर पकडून त्यांच्या तोंडावर मारहाण केली, तर शशिकांत याने त्यांचा उजवा हात पिरगळला.
‘इथे राहू देणार नाही’, अशी धमकी
मारहाणीदरम्यान शिवानी आणि त्यांचा भाऊ शंभुराज यांना जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच शंभुराज यांच्याविरुद्ध खोटे गुन्हे दाखल करून त्यांना तुरुंगात पाठविण्याची धमकी देण्यात आली. या प्रकरणी शिवानी भंडलकर यांच्या फिर्यादीवरून शशिकांत भोई, वंदना भोई, सुसाबाई भोई, जया दत्तात्रय फतुले, ताई भोई आणि प्रशांत भोई यांच्यासह संबंधितांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.







