पुणे : पुणे विभाग विधानपरिषद पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील राजकीय घडामोडींना मोठा वेग आला आहे. जागावाटपावरून निर्माण झालेला पेच अखेर सुटला असून, शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपच्या बंडखोर उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतली आहे. यामुळे पुणे पदवीधर आणि पुणे शिक्षक या दोन्ही जागांवर महायुतीचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला आहे.

पुणे शिक्षक मतदारसंघात महायुतीत जोरदार रस्सीखेच पाहायला मिळाली होती. या जागेवर भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) अशा तिन्ही पक्षांनी दावा केला होता. सुरुवातीला सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादीने या जागेवरून माघार घेतली. त्यानंतर भाजपने श्री विवेकानंद स्वामी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून कार्यरत असलेले कौस्तुभ गावडे यांना रिंगणात उतरवले. मात्र, शिवसेना शिंदे गटाकडून मंगेश चिवटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने महायुतीत तणाव निर्माण झाला होता.

अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या टप्प्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार मंगेश चिवटे यांनी आपला अर्ज मागे घेतला. त्यामुळे पुणे शिक्षक मतदारसंघातून कौस्तुभ गावडे हेच आता महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार आहेत.

दुसरीकडे, पुणे पदवीधर मतदारसंघात भाजपचे बंडखोर उमेदवार भैय्या माने यांनीही माघार घेतली आहे. या निर्णयानंतर पदवीधर मतदारसंघातून स्मिता जाधव या महायुतीच्या अधिकृत उमेदवार म्हणून रिंगणात राहिल्या आहेत.
महायुतीच्या अंतर्गत बंडखोरी शमल्यामुळे भाजप आणि शिवसेनेतील वाद मिटला असून महायुतीला मोठा दिलासा मिळाला आहे. दोन्ही मतदारसंघांतील उमेदवारांची अधिकृत घोषणा झाल्यामुळे आता निवडणूक प्रचाराला अधिक वेग येणार आहे.







