पिंपरी : झोपडपट्टीत राहिल्याने मुले बिघडत असल्याचे सांगत दुसरीकडे राहण्याबाबत बोलणे थोरल्या भावाला महागात पडले. याच मुद्द्यावरून झालेल्या वादात धाकट्या भावाने शिवीगाळ करत थोरल्या भावाच्या पोटात चाकू भोसकून गंभीर जखमी केल्याचा प्रकार चिंचवड येथे घडला.

या घटनेत अंकुश पोपट नलावडे (वय ३५, रा. दत्तनगर, माकडगल्ली, चिंचवड) हे जखमी झाले आहेत. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी त्यांचा धाकटा भाऊ अविनाश पोपट नलावडे याला अटक केली आहे. २६ सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरात हा प्रकार घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंकुश नलावडे हे चालक म्हणून काम करतात. घटनेच्या दिवशी ते घरी असताना मोठी वहिनी पूजा नलावडे यांच्यासमोर त्यांनी झोपडपट्टीतील वातावरणामुळे आपली मुले बिघडत असल्याने दुसरीकडे राहण्याचा विचार असल्याचे सांगितले. यावर अविनाश याला राग आला. ‘तू घर फोडतोस का?’ असे म्हणत त्याने अंकुश यांच्याशी वाद घातला आणि शिवीगाळ केली.

दोघांमध्ये वाद सुरू झाल्यानंतर पूजा नलावडे यांनी मध्यस्थी करत भांडण थांबवले. त्यानंतर अंकुश घराबाहेर रस्त्यावर जाऊन उभे राहिले. त्यावेळी अविनाश घरातील स्वयंपाकघरातून चाकू घेऊन बाहेर आला. त्याने अंकुश यांच्या पोटात चाकू भोसकल्याने ते गंभीर जखमी झाले.
जखमी अंकुश नलावडे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पिंपरी पोलिसांनी अविनाश नलावडे याला अटक केली असून सहायक पोलीस निरीक्षक अमोल कदम पुढील तपास करीत आहेत.







