पुणे : साडेसतरानळी (हडपसर) परिसरात पुनावाला ग्रुपच्या सुरक्षा रक्षकांकडून पोलिसांच्या वाहनांसारख्या गाड्यांचा वापर तसेच स्थानिक नागरिकांना रस्त्यावरून जाण्यास अडवले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी क्रांती शेतकरी संघटनेचे संस्थापक व अध्यक्ष अमोल नाना तुपे यांनी पुणे पोलीस आयुक्त आणि वाहतूक पोलिसांच्या उपायुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनानुसार, साडेसतरानळी परिसरात गस्तीसाठी वापरल्या जाणाऱ्या काही वाहनांवर पोलिसांच्या वाहनांप्रमाणे लाल आणि निळे फ्लॅशर दिवे लावण्यात आल्याचा आरोप आहे. या वाहनांमुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो, तसेच पोलिसांच्या वाहनांचे अनुकरण होत असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. संबंधित वाहनांवर नियमांनुसार कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

सामान्य नागरिकांच्या वाहनांमध्ये नियमबाह्य बदल आढळल्यास वाहतूक पोलीस आणि आरटीओकडून कारवाई केली जाते. त्यामुळे खासगी कंपनीच्या सुरक्षा वाहनांबाबतही प्रशासनाने नियमांनुसार कारवाई करावी, अशी भूमिका तुपे यांनी निवेदनातून मांडली आहे.

याशिवाय, साडेसतरानळी गावातील सार्वजनिक रस्त्यांवरून जाणाऱ्या स्थानिक नागरिक, महिला आणि शाळकरी विद्यार्थ्यांना सुरक्षा रक्षकांकडून अडवले जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. सार्वजनिक रस्त्यांवर नागरिकांच्या ये-जा करण्यास अडथळा निर्माण केला जात असल्यास त्याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
या प्रकरणी पोलिसांसारख्या स्वरूपात वापरल्या जाणाऱ्या संबंधित गाड्यांची तात्काळ तपासणी करून त्या जप्त कराव्यात, तसेच आरटीओच्या नियमांनुसार कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. नागरिकांना सार्वजनिक रस्त्यावर अडवणाऱ्या सुरक्षा रक्षकांवरही कायदेशीर कारवाई करावी, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
साडेसतरानळी परिसरातील नागरिकांची सुरक्षितता आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेऊन पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी अमोल नाना तुपे यांनी केली आहे.







