पुणे : शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या बाणेर-पाषाण लिंक रोडच्या भूसंपादनाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. तब्बल १५ वर्षांपासून प्रलंबित असलेली भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झाली असून अंतिम निवाड्यानंतर पुणे महानगरपालिकेने संबंधित जागेचा प्रत्यक्ष ताबा घेण्याची कार्यवाही सुरू केली आहे.

पुणे शहराच्या मंजूर विकास आराखड्यानुसार मौजे पेठ पाषाण, ता. हवेली येथील सर्व्हे क्रमांक १३४ (पै) ते १३८ आणि १४० मधून ३६ मीटर रुंदीचा विकास योजना रस्ता प्रस्तावित आहे. भूसंपादनाची प्रक्रिया रखडल्यामुळे बाणेर-पाषाण लिंक रोडचे काम अनेक वर्षांपासून पुढे सरकू शकले नव्हते.

या प्रकल्पासाठी आवश्यक असलेली भूसंपादनाची प्रक्रिया आता पूर्ण झाली आहे. संबंधित जमीनधारकांना पुणे महानगरपालिकेकडून सुमारे ६८ कोटी रुपयांचा मोबदला अदा किंवा वर्ग करण्यात आला आहे. कायदेशीर आणि आर्थिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने अंतिम निवाडा जाहीर केला.

अंतिम निवाड्यानंतर महापालिकेच्या पथकाकडून संबंधित जागेवर जाऊन अधिकृत ताबा घेण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. ताबा घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पथ विभागाकडून रस्त्याचे उर्वरित काम प्राधान्याने हाती घेण्यात येणार आहे.
बाणेर-पाषाण लिंक रोड पूर्ण झाल्यानंतर बाणेर, पाषाण, सुतारवाडी आणि परिसरातील नागरिकांना वाहतूक कोंडीतून दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. या मार्गामुळे परिसरातील वाहतूक अधिक सुरळीत होण्यास मदत होणार आहे.
या भूसंपादन प्रक्रियेसाठी महापालिका आयुक्त नवल किशोर राम, अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) ओमप्रकाश दिवटे, भूसंपादन व व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त निखिल मोरे, संबंधित अभियंते तसेच मालमत्ता, बांधकाम आणि पथ विभागातील अधिकाऱ्यांनी पाठपुरावा केला. विशेष भूमिसंपादन अधिकारी कार्यालय, जिल्हा प्रशासन आणि पुणे महानगरपालिका यांच्यातील समन्वयातून भूसंपादनाचा महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे.
जागेचा ताबा घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रस्त्याचे उर्वरित काम सुरू करून हा मार्ग शक्य तितक्या लवकर नागरिकांसाठी खुला करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न राहणार आहे.






