यवत, ता. 02 : ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांसाठी लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या दिशेने निघालेल्या ओबीसी एल्गार मोर्चाला तात्पुरता ब्रेक देण्यात आला आहे. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी लक्ष्मण हाके यांना फोन करून मुंबईत चर्चेसाठी बोलावल्यानंतर मोर्चा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा कालपासून मुंबईच्या दिशेने रवाना झाला होता. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून चर्चेचे निमंत्रण आल्यानंतर आंदोलनकर्त्यांमध्ये हालचालींना वेग आला. बावनकुळे यांनी हाके यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधत मुख्यमंत्र्यांसोबत बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती आहे. या आश्वासनानंतर हाके यांनी मोर्चा तात्पुरता थांबवण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, मोर्चा स्थगित झाला असला तरी ओबीसी समाजाच्या मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलनाची धार कायम ठेवण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. हा लढा केवळ एखाद्या व्यक्तीच्या समाधानासाठी नसून, संपूर्ण ओबीसी समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी असल्याचे कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले. आता मुंबईत मुख्यमंत्री आणि ओबीसी प्रतिनिधींच्या बैठकीत नेमकी काय चर्चा होते आणि त्यातून कोणता तोडगा निघतो, याकडे ओबीसी समाजासह संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.








