केडगाव(पुणे) : शनिवारी गणरायाचे आगमन होणार असून येणारा गणेशोत्सव आनंददायी व निर्विघ्न पार पाडावा, यासाठी सार्वजनिक उत्सव मंडळांनी वीज सुरक्षेबाबत गांर्भियाने उपाययोजना कराव्यात. तसेच घरगुती वीज पुरवठ्याच्या दराने सार्वजनिक उत्सवांसाठी उपलब्ध असलेली अधिकृत तात्पुरती वीज जोडणी घ्यावी, याकरता गणेश मंडळानी आवश्यक कागदपत्रांसह नजीकच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.
गणेशोत्सवात सर्वसामान्य नागरिक सहभागी होतात. त्यांच्या आनंदावर विरजण पडू नये, कुठलीही अप्रिय घटना होऊ न देता भाविकांना देखाव्यांचा आनंद घेता यावा, यासाठी सार्वजनिक मंडळांनी रोषणाई आणि मिरवणुकीतील देखाव्यांचा परिसरातील विद्युत तारा आणि खांबांना स्पर्श होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. मांडव उभारणी करताना विजेचे खांब, तसेच पथदिव्यांच्या खांबाचा आधार घेऊ नये, त्या खांबापासून मांडव दूर असावा.
वीज जोडणीसाठी लागणारी तार किंवा केबल विजेचा भार पेलण्यास सक्षम असल्याची खातरजमा करावी, ठिकठिकाणी जोड असणारी किंवा तुटलेल्या किंवा लूज वायर वापरू नयेत. वायारीस जोड देण्यास प्रमाणित इन्सूलेशन टेप वापरावा. भक्तांच्या सूरक्षेच्या कारणास्तव गणेश मंडळांनी वीज सुरक्षा उपाययोजनांबाबत तडजोड करू नये. जेणेकरून कुठलीही दुर्घटना होणार नाही असे आवाहन केडगाव डिव्हिजनचे उपकार्यकारी अभियंता सागर कटके यांनी केले आहे.