अजित जगताप
वडूज : हर हर महादेव, श्री भोलेनाथ की जय, श्री काशी विश्वेश्वर की जय, श्री तारकेश्वर की जय अशा जयघोषामध्ये खटाव तालुक्यातील वडूज नगरीमध्ये मोठ्या भक्तीभावाने महाशिवरात्र निमित्त धार्मिक विधी व भाविकांना दुधाचा महाप्रसाद देण्यात आला.
वडूज नगरीपासून दोन किलोमीटरवर अंतर असलेल्या येरळामाई नदीच्या काठावर तारकेश्वर मंदिरात आज नऊ महिन्याच्या बालक शिव मनोज गोडसे ते वयोवृद्ध असलेल्या भाविकांनी तसेच अनेकांनी ‘श्री’ चे दर्शन घेऊन ही महाशिवरात्र साजरी केली आहे.
त्याचबरोबर वडूज बाजारपेठेतील श्री काशी विश्वेश्वर मंदिरांमध्ये शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण पूर्ण केले असून सकाळी रुद्र मंडळाचे रुद्र पठण, महाआरती करण्यात आली. श्री महादेव मंदिर ट्रस्टच्या वतीने या ठिकाणी भाविकांना दुधाचा प्रसाद वाटप करण्यात आला.
तसेच मान्यवरांचा श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला होता. नवनाथ गोडसे, पदमनील कणसे, सुशांत पार्लेकर, रेवन म्हमाणे, विजय माळी(तात्या), अश्विन बोटे, प्रमोद बुगड, संतोष गोडसे, मनोज गोडसे यांनी या महा शिवरात्र निमित्त परिश्रम घेतले .
वडूज नगरीमध्ये धार्मिक उत्सव साजरा करण्यासाठी सर्व जाती-धर्माचे लोक सहभागी होत असतात. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या पूर्वसंध्येला या महाशिवरात्र दिनी भाविकांनी श्री चे दर्शन घेऊन उद्या होणाऱ्या शिवजयंतीची जय्यत तयारीला अंतिम टप्प्यात शेवटचे अवलोकन करण्यास सुरुवात केली आहे.
वडूज बस स्थानक शेजारील बॉक्सर ग्रुप व कर्मवीर मित्र मंडळ, भागोदय मित्र मंडळाने भगवा ध्वज व शिवप्रतिमा व आकर्षक अशी सजावट केलेली आहे. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यासाठी सर्व शिवाजी महाराज प्रेमी सज्ज झालेले आहेत. अशी माहिती निलेश गोडसे, विनोद शिंदे, सूरज पोतदार, नितीन वायदंडे, योगेश हिरवे व शिव प्रेमींनी दिली आहे.