लोणी काळभोर, ता. 11 : कर्तव्य बजावताना गंभीर हलगर्जीपणा (Loni Kalbhor News) आणि प्रशासनाची प्रतिमा मलिन करणाऱ्या निष्काळजी कारभाराचा अखेर फटका बसला असून लोणी काळभोर येथील ग्राम महसूल अधिकारी बाळासाहेब श्रीपती वनवे यांना जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ प्रभावाने निलंबित केले आहे. प्रशासनाच्या कामकाजात झालेल्या गंभीर त्रुटींमुळे ही कडक कारवाई करण्यात आल्याने महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे.
तहसिलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी कार्यालय, लोणी काळभोर यांच्या अहवालानंतर हा प्रकार उघडकीस आला. संबंधित अधिकारी पदावर कार्यरत असताना त्यांनी कर्तव्यात अक्षम्य आणि गंभीर हलगर्जीपणा केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम 1979 मधील नियम 4 (1)(अ) अंतर्गत अधिकार वापरून त्यांना तात्काळ निलंबित केले. तसेच त्यांच्या विरोधात नियम 8 नुसार शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

निलंबनाच्या आदेशानुसार पुढील आदेश होईपर्यंत बाळासाहेब वनवे निलंबित राहणार असून त्यांच्या निलंबन काळातील मुख्यालय तहसिल कार्यालय जुन्नर येथे निश्चित करण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय त्यांना मुख्यालय सोडण्यास मनाई करण्यात आली आहे. याशिवाय निलंबनाच्या कालावधीत त्यांनी कोणतीही खासगी नोकरी स्वीकारू नये किंवा कोणताही व्यवसाय करू नये, असे स्पष्ट बजावण्यात आले आहे.
दरम्यान, लोणी काळभोर अपर तहसील कार्यालयाने वनवे यांच्या दप्तराची सविस्तर तपासणी करून महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम 1979 मधील नियम 8 नुसार विभागीय चौकशीचा प्रस्ताव एक महिन्याच्या आत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या कारवाईमुळे महसूल विभागातील निष्काळजीपणावर प्रशासनाने कडक बोट ठेवले असल्याची चर्चा सुरू असून भविष्यात अशा प्रकारच्या हलगर्जीपणाला कोणतीही माफी दिली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश प्रशासनाने दिला आहे.







